पांड्या खेळ सुधार, ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो जागा; गावस्कर यांनी सांगितले अचंबित करणारे नाव

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या खराब फॉर्मात आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही तो कमाल करू शकलेला नाही. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या पांड्याची कामगिरी सुमार राहिली आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोलही होत आहे. तसेच खराब कामगिरीनंतरही त्याला संघात स्थान दिल्यामुळे सवालही उपस्थित होत आहेत.

श्रीलंका दौऱ्यावर हिंदुस्थानच्या संघात बहुतांश खेळाडू नवखे आहेत. अशात सिनिअर खेळाडू असतानाही हार्दिक पांड्या विशेष चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि क्रिकेट समालोचक सुनिल गावस्कर यांनीही पांड्याच्या खेळावर सवाल उपस्थित करत त्याची जागा कोणता खेळाडू घेऊ शकतो हे देखील सांगितले.

‘स्पोर्टस तक’शी बोलताना सुनिल गावस्कर म्हणाले की, हिंदुस्थानकडे चांगल्या खेळाडूंचा बॅकअप आहे. दिपक चहर देखील अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम इंडियाकडून खेळू शकतो. तसेच भुवनेश्वर कुमारकडेही ती क्षमता आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी त्याने धोनीसोबत मिळून एक सामनाही जिंकून दिला होता, असेही गावस्कर म्हणाले.

टीम इंडिया 1-0 ने पुढे

तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा संघ सध्या 1-0 असा आघाडीवर आहे. पहिल्या लढतीत टीम इंडियाने 5 विकेटस गमावून 164 धावा केल्या होत्या आणि श्रीलंकेला 18.3 षटकात बाद करत 38 धावांनी सामना जिंकला होता. या लढतीत भुवनेश्वर कुमारने 4 आणि दिपक चहरने 2 बळी घेतले होते.

कोरोनाचे संकट

दरम्यान, टीम इंडियावर कोरोनाचे संकट असून कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या चार ते पाच खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले आहे. पांड्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने 27 जुलैला होणारा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या