
हमास आणि इस्रायलमधील रक्तरंजित संघर्ष अतिशय घातक वळणावर पोहोचला आहे. आज मंगळवारी रात्री इस्रायलच्या सैन्याने गाझामधील रुग्णालयावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल 500 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा गाझामधील पॅलेस्टीनी आरोग्य मंत्रालयाने केला आहे. 2008 नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. अल अहली हॉस्पिटलवर हल्ला झाला. हल्ल्यानंतर जिकडे तिकडे छिन्नविछिन्न मृतदेहांचा खच, रक्ताचा सडा आणि संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या हॉस्पिटलचा ढिगारा असेच चित्र होते. त्यानंतर हमासनेही तेल अवीव आणि अल्कलोन या ठिकाणी रॉकेट्सने हल्ले केले.
हिजबुल्लाहकडून इस्रायलचे टेहळणी कॅमेरे उद्ध्वस्त
इस्रायलच्या पाच महत्त्वाच्या ठिकाणांवरचे टेहळणी पॅमेरे हिजबुल्लाहने उद्ध्वस्त करून टाकले. तसेच सकाळच्या सुमारास उत्तर गाझामधील मेटुला शहरावर रॉकेट्स डागली. लेबनॉन सीमेवरून हिजबुल्लाहचे दहशतवादी सातत्याने रॉकेट्स डागत असल्यामुळे सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, युद्ध सुरू झाल्यानंतर हिजबुल्लाहकडूनही इस्रायलला रॉकेट्स आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.
गाझापट्टीत महामारी पसरण्याची भीती
लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक हे पाण्याशिवाय जास्त दिवस काढू शकत नाहीत. स्वच्छतागृहांमध्येही पाणी नाही. पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, अशा स्थितीत गाझापट्टीत डायरिया, कॉलरा, डीसेंट्री अशाप्रकारचे आजार तसेच महामारी पसरण्याचा धोका असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
हमासचा टॉपचा कमांडर ठार
इस्रायलने हमास आणि हिजबुल्लावर हवाई हल्ला केला. त्यात हमासचा वरिष्ठ कमांडर अयमान नोफाल हा ठार झाला तर हिजबुल्लाच्या दोन दहशतवाद्यांनाही इस्रायली सैन्याने ठार केल्याचे वृत्त आहे. अयमान हा हमासच्या जनरल मिलिटरी काऊन्सिलचा सदस्य होता.
हमासला मुळासकट नष्ट करत नाही तोपर्यंत हल्ले थांबणार नाहीत
हमासला मुळासकट नष्ट करत नाही तोपर्यंत हल्ले थांबणार नाहीत, अशी शपथच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान घेतल्याचे वृत्त आहे. याबाबतची माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने एक्स अकाऊंटवरून दिली आहे.
इस्रायलने हमासविरोधात कोणत्या कारवाया केल्या याबाबतची माहिती बेंजामिन नेतन्याहू यांनी व्लादिमीर पुतीन यांना दिली. दरम्यान, रक्तपात थांबवण्यासाठी आवश्यक ती ठोस पावले उचलण्याचे आवाहन पुतीन यांनी टेलिपह्नवरील चर्चेदरम्यान नेतान्याहू यांना केले.
गेल्या 11 दिवसांत गाझापट्टीतील सुमारे 2 हजार 778 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला, तर हमासच्या हल्ल्यात सुमारे 1 हजार 400 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. n हमासने जवळपास 200 इस्रायलींना ओलीस ठेवल्याचे वृत्त आहे. n क्रुड तेलाच्या किंमती 90 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेल्या.
























































