George Fernandes – कोकण रेल्वेचा खरा निर्माता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अशक्य वाटणाऱया कोकण रेल्वे प्रकल्पाचे खरे निर्माते जॉर्ज फर्नांडिस आहेत. 1989 मध्ये पंतप्रधान व्ही. पी. सिंग सरकारमध्ये रेल्वेमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच जॉर्ज यांनी पहिल्याच आठवडय़ात दोन घोषणा केल्या. मुंबई ते मंगलोर कोकण रेल्वे आणि बिहारमधील गदग नदीवरील पूल. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी कोकण, गोवा आणि कर्नाटकाला जोडणारा हा भव्य रेल्वे प्रकल्प 741 कि.मी.ची सागरी किनारपट्टी जोडणारा हा मार्ग. डोंगर, दऱया, नद्या ओलांडून 169 मोठे तर 1670 लहान पूल, 88 बोगदे असे प्रचंड काम करून दहा वर्षांत हा प्रकल्प पूर्ण झाला. 1989 मध्ये प्रकल्पाची घोषणा होताच जॉर्ज यांनी तत्कालीन अर्थमंत्री मधू दंडवते, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष रामकृष्ण हेगडे, पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची मंजुरी मिळविली. ई. श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केली. सुरुवातीला या प्रकल्पासाठी 1600 कोटींची तरतूद केली होती. 3400 कोटींमध्ये प्रकल्प पूर्ण झाला. हिंदुस्थानच्या रेल्वेच्या इतिहासातील अत्यंत मानाचा हा प्रकल्प अवघ्या दहा वर्षांत पूर्ण झाला. अशियामधील सर्वात लांब पल्ल्याचा हा प्रकल्प आहे.  कोकण रेल्वे होण्याआधी मुंबईकरांना कोकणात जाण्यासाठी रेल्वेमार्ग नव्हता. 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा जॉर्ज फर्नांडिस देशाचे संरक्षणमंत्री होते.