घरडातील स्फोटाचा अहवाल लवकरच राज्यसरकारकडे – उदय सामंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरडा केमिकल येथे आज स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला आणि एक कामगार गंभीर आहे. शॉर्टसर्कीट होऊन ही आग लागल्याचे कंपनीच्या प्रशासनाने सांगितले. कंपनीच्या केमिकल रिअ‍ॅक्शन होतात त्यावेळी शॉर्टसर्कीट झाल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती दिली असली तरी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित विभाग या स्फोटाची चौकशी करुन सरकारला लवकरच अहवाल देईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

घरडा कंपनीमध्ये स्फोट होऊन आज दुर्घटना घडली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़. त्यानंतर कंपनीतील अधिकारी वर्गासोबत त्यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर चिपळूण येथील पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी सांगितले की, घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याशी संपर्क साधून मला घटनास्थळी भेट देण्यास सांगितले़. ते स्वतः या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहेत.

स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना 55 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे जो कर्मचारी जखमी झाला आहे त्या व्यक्तीलाही 20 लाखांची मदत कंपनी करणार आहे. ज्या पाचजणांच्या नातेवाईकांना कंपनीत नोकरी हवी आहे, त्यांना कायमस्वरुपी नोकरी देण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत सांगितले. काही दिवसांनंतर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मृतांच्या नातेवाईकांसोबत बैठक घेऊन त्यांना आणखी काही मदत करता येईल का, याबाबत विचार केला जाईल असेही सामंत यांनी स्पष्ट केले़.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय खेड येथे होते ते चिपळूणमध्ये आणून बसवले. ते कार्यालय पुन्हा खेडमध्ये नेण्याचा आज निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर तेथील उपअभियंता चव्हाण हे दुर्घटनेच्यावेळी घटनास्थळी उपस्थित नव्हते. ही गोष्ट उघडकीस आल्याने पर्यावरण मंडळाचे अधिकारी शिनगारे त्यांची खातेनिहाय चौकशी करणार आहेत.