घाटकोपरमध्ये अनधिकृतपणे बुजवलेल्या विहिरीची खाऊगिरी, कार केली गिळंकृत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपरमधील एका सोसायटीच्या आवारात आज जमीन खचून त्यात पार्क केलेली कार 40 फूट खोल बुडाली. बघता बघता ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि नेहमीप्रमाणे कशाचीही शहानिशा न करता पालिकेवर टीकेची झोड उठली. मात्र प्रत्यक्षात ती कार सोसायटीने अनधिकृतपणे बुजवलेल्या विहिरीने गिळली असल्याचे उघड झाल्यानंतर टीकाकारांची तोंडे बंद झाली.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत असून त्याचबरोबर सुरू झालेल्या मान्सूनच्या तोंडावर येणाऱया अतिवृष्टी, वादळ यांसारख्या आव्हानांचाही यशस्वी मुकाबला करत आहे. मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईला पावसाने झोपडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते तर अतिवृष्टीवेळीच समुद्राला भरती आल्यामुळे सखल भागांत पाणी साचले होते. हवामान खात्याने आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाच दुपारी सोशल मीडियावर इमारतीच्या आवारातच जमीन खचून कार बुडाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता ही कार बाहेर काढण्यात आली.

आरसीसी करून अर्धी विहीर बुजवली

घाटकोपर पश्चिम येथील कामा लेनमधील रामनिवास ही जुनी सोसायटी आहे. या सोसायटीतील एक विहीर सोसायटीने ‘आरसीसी’ करून अर्धवट बंद केली आहे. जी जागा बंद करण्यात आली आहे त्या जागेवर सोसायटीतील रहिवासी ‘कार पार्क’ करीत आहेत. मात्र या ‘आरसीसी’चा भाग आज खचला आणि त्यावर पार्क केलेली पंकज मेहता यांची कार बुडाली, मात्र कारमध्ये कोणीही नसल्यामुळे कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही तसेच कोणीही जखमी झालेले नाही. ही विहीर सोसायटीच्या मालकीची आहे. त्यामुळे या घटनेचा पालिकेशी काहीही संबंध नाही, अशी माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याने दिली.

विहीर बुजवल्याप्रकरणी सोसायटीला नोटीस

विहिरीची मालकी सोसायटीकडे असली तरी ती अनधिकृतपणे बंद करण्याचा अधिकार सोसायटीला नाही. त्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते, मात्र तशी परवानगी न घेता सोसायटीने विहीर अर्धवट बुजवली आहे. याप्रकरणी अनधिकृत आरसीसी करून विहीर बुजवल्यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, अशी नोटीस उद्या आम्ही सोसायटीला बजावू. त्यानुसार पुढील न्यायालयीन प्रक्रिया करू, अशी माहिती ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली.