घोडबंदरवर अवजड वाहनांची घुसखोरी, ठाणेकरांची तीन तास ट्रॅफिककोंडी

मेट्रोची कामे, खड्यात गेलेला रस्ता, बंदी असताना सर्रासपणे होणारी अवजड वाहनांची घुसखोरी यामुळे घोडबंदरवर ट्रॅफिकचा अक्षरशः विचका उडाला आहे. त्यातच गायमुखजवळ आज भररस्त्यात ट्रक आडवा झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अर्ध्या तासाचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना दोन ते तीन तास लागत होते. त्यामुळे ठाणेकर रविवारी वाहतूककोंडीच्या चक्रव्यूहातच अडकले.

ठाणे घोडबंदर राज्य मार्ग ८४ रस्त्यावरील गायमुख घाट येथील रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ठाणे वाहतूक शाखेकडून अवजड वाहनांसाठी घोडबंदरवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कासारवडवली उपविभागीय वाहतूक शाखेअंतर्गत ११ ऑक्टोबर रात्री १२ ते १४ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत सर्व अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आल्याच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. या अधिसूचना अत्यावश्यक सेवासुविधा पुरवठा करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान आज सकाळी ठाणे येथून घोडबंदर वाहिनीवर गायमुख घाटाजवळील हनुमान मंदिरसमोर एक ट्रक पलटी झाला. या अपघातामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. त्यातच रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्त बंदी असतानाही अवजड वाहनांनी केलेल्या घुसखोरीमुळे प्रचंड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याप्रकरणी माहिती मिळताच कासारवडवली वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हिप्पो क्रेनच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून टक बाजला केला.

भिवंडीत कंटेनर पलटी
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गाव-रील ठाणे-भिवंडी बायपासजवळ आज सकाळी कंटेनर पलटी झाला. ओवाळी खिंड आरसी ढाबा येथे हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कंटेनर रस्त्याच्या मधोमध आडवा होऊन पलटी झाला. यामुळे ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. त्यामुळे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेत कंटेनरचालक जखमी झाला आहे. याबाबत माहिती मिळताच नारपोली व कोनगाव वाहतूक पोलिसांनी चार हायड्रा क्रेनच्या मदतीने पलटी झालेला कंटेनर बाजूला केला.