‘जितो‘ जैन संस्थेविरुद्ध गिरगावकरांनी दंड थोपटले, विल्सन जिमखान्याला जैनखाना बनविणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबईतील ऐतिहासिक आणि क्रीडासंपन्न वारसा असलेला विल्सन जिमखाना गिळंकृत करायला निघालेल्या ‘जितो’ या जैन संस्थेविरोधात गिरगावकरांनी दंड थोपटले आहेत. जितोविरुद्ध आपला संताप दाखवण्यासाठी क्रीडा संस्कृती जपणाऱया ‘आम्ही गिरगांवकर’, मराठी जनता, तसेच विल्सनचे आजी-माजी विद्यार्थी मंगळवारी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकाऱयांना निवेदन देणार आहेत.

खेळाच्या मैदानावर खेळच खेळले गेले पाहिजेत. त्या जागी धार्मिक-शैक्षणिक पाठशाळा चालवण्याचा प्रयत्न क्रीडा संस्कृतीला धक्का देणारा असल्याचा आरोप स्थानिकांनी जितो संस्थेविरुद्ध केला आहे. स्थानिकांच्या मते हा लढा फक्त मैदानाचा नाही हा आपल्या सांस्कृतिक, क्रीडात्मक अस्तित्वाचा लढा आहे. त्यामुळे खेळाशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या ‘जितो’ संस्थेला जिमखाना देऊ नये, अशी ठाम भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. तसेच जिमखाना पुन्हा विल्सन कॉलेज किंवा गिरगांवकर प्रतिष्ठानला द्यावे, असेही निवेदन ते जिल्हाधिकाऱयांना देणार आहेत. या जिमखान्यात मराठी मैदानी खेळ, तसेच इतर खेळांचे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य देण्यात येईल, असाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे याच मैदानातील एका कोपऱयात कोळी भगिनींसाठी काही जागा राखीव ठेवली जावी, असेही निवेदनात म्हटले आहे.