बनावट कागदपत्रांद्वारे आईनेच विकले मुलीचे घर, सावेडी उपनगरातील घटना; चौघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलीच्या नावे असलेल्या घराची बनावट कागदपत्रे तयार करून आई व इतर तिघांनी घराची परस्पर विक्री केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कमलाबाई शंकर कडेकर, भावजयी सुषमा शामराव कडेकर (दोघी रा. आलमगीर, भिंगार), कुणाल मंत्री (रा. दौंड, पुणे), प्रिन्स हाउसिंग सोसायटीचे विसर्जन अधिकारी मेहेर प्रकाश बापू देठे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनुजा संजय बोरकर (काशिबाई शंकर कडेकर (माहेरचे नाव), रा. पौड रस्ता, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

अनुजा बोरकर यांनी 1991 साली सावेडीतील प्रिन्स हाउसिंग सोसायटीत रो-हाउस घेतले होते. त्यावर महाराष्ट्र स्टेट को-ऑफ हौसिंग फायनान्स कार्पोरेशन या संस्थेकडून कर्ज घेतले होते. 28 ऑक्टोबर 1991 रोजी बोरकर यांना घराचा ताबा मिळाला होता. तेव्हापासून त्यांच्या या घरात दोन भाडेकरू राहत होते.

दरम्यानच्या काळात प्रिन्स सह. गृहनिर्माण संस्था, सावेडीचे जागामालक अल्ताफ शेख यांचा मृत्यू झाल्याने जागेचे खरेदीखत होऊ शकले नाही. परंतु मनपाची करपावती, ताबा पावती, कर्जप्रकरणावर घरमालक म्हणून बोरकर यांचेच नाव आहे. दरम्यान, बोरकर यांनी हे घर विकण्यासाठी काढले असता, 30 मार्च 2022 रोजी बोरकर यांच्या माहेरच्या नावे असलेले हे घर त्यांची आई कमलाबाई यांनी परस्पर लक्ष्मण विठ्ठल गुंड (रा. शेवगाव) यांना विकल्याचे बोरकर यांना समजले. कमलाबाई, भावजयी सुषमा कडेकर यांनी या घरातील भाडेकरूंना घर रिकामे करण्यासाठी धमकी दिली. तसेच, बोरकर यांनी अधिक माहिती घेतली असता, आईचा नातजावई कुणाल मंत्री व महाराष्ट्र स्टेट को- ऑफ हाउसिंग फायनान्स कार्पोरेशनचे मॅनेजर व प्रिन्स हाउसिंग सोसायटीचे विसर्जन अधिकारी मेहेर प्रकाश बापू देठे यांच्यासह घराची खोटी कागदपत्रे बनवून घराची परस्पर विक्री केल्याचे त्यांना समजले. त्यामुळे बोरकर यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे.