
घर आणि काम अशी दुहेरी भूमिका बजावणाऱया महिला पोलीस अंमलदारांची डय़ुटी आठ तासांची करा असे निर्देश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सर्व आयुक्त व अधीक्षकांना दिले आहेत. कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी यांचा ताळमेळ जमविण्यासाठी कामाचे तास कमी करणे हा एक उपाय ठरू शकतो असे महासंचालकांचे म्हणणे आहे. 12 तासांची डय़ुटी आणि कौटुंबिक जबाबदारी या दोन्ही जबाबदाऱया पार पाडताना महिला अंमलदारांवर ताण पडतो. त्याचा परिणाम महिला अंमलदारांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर पडतो. त्यामुळे आठ तासांची डय़ुटी केल्यास त्यांच्या कर्तव्यातील चार तास कमी होतील. यामुळे रजा मागण्याचे, सिकमध्ये जाण्याचे, गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी होईल. शिवाय आठ तासांची डय़ुटी करून त्यांना कुटुंबालादेखील वेळ देता येईल. याबाबत राज्यातील महिला अंमलदारांनी आठ तासांची डय़ुटी करावी अशी विनंती महासंचालकांकडे केली होती. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून महिला अंमलदारांना आठ तासांची डय़ुटी द्या असे लेखी निर्देश महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱयांना दिले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सध्या आठ तास डय़ुटी सुरू करून पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्याबाबत सांगितले आहे.





























































