
गौरी-गणपती, देवी विसर्जनासह वर्षभर साजरे होणारे सण-उत्सव चौपाटय़ांवर कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडावेत यासाठी मुंबई महापालिका, पोलिसांसह शेकडो हंगामी लाईफगार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, गणेशोत्सव जवळ आला असतानाही वरळीतील 55 हंगामी लाइफगार्डना अजूनही ओळखपत्र मिळालेले नाही. त्याचबरोबर हे ओळखपत्र वर्षभरासाठी जारी करावे, अशी मागणी वरळीतील जीवदानी जलजीवन मंडळाने केली आहे.
मुंबईत वर्षभर मोठय़ा प्रमाणात सण-उत्सव साजरे केले जातात. यात गणपती, गौरी तसेच चौपाटय़ांवर साजरे केल्या जाणाऱया बहुभाषिक सणांचाही समावेश असतो. अशा वेळी समुद्रात एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका, पोलिसांकडून चौपाटय़ांवर लाइफगार्डही तैनात केले जातात. यात गौरी-गणपतीसाठी विविध मंडळांकडून विनामूल्य सेवा बजावणाऱया शेकडो हंगामी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून वरळी कोळीवाडय़ातील 55 तरुण हे गौरी-गणपतीला वरळी, दादर, माहीम चौपाटय़ांवर लाइफगार्ड म्हणून काम करत आहेत. मात्र, गेली दोन वर्षे या लाइफगार्डला ओळखपत्र मिळालेले नाही.
आणीबाणीतही पुढाकार
सणासुदीतील दुर्घटना रोखण्याबरोबरच कोणी बुडाला तर अशा व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा हेच हंगामी लाईफगार्ड असलेली स्थानिक तरुण मंडळी धाव घेतात. आणीबाणीच्या प्रसंगी हेच लाईफगार्ड पुढाकार घेतात. अशा वेळी पोलीसच आमची उलट तपासणी करतात, पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागते. त्यामुळे आम्हाला केवळ गौरी-गणपतीसाठी ओळखपत्र देऊ नये, तर वर्षभरासाठी ओळखपत्र जारी करावे अशी मागणी जीवदानी जलजीवन मंडळाचे अध्यक्ष विकास कोळी यांनी केली आहे.
गौरी-गणपतीच्या सणाला विनामूल्य काम करणाऱया लाईफगार्डला वॉर्ड ऑफिसमधून हंगामी स्वरूपाचे ओळखपत्र आम्ही देतो. आमच्याकडे निवेदन आले की, आम्ही त्यांना जारी करतोच, पण गौरी-गणपतीव्यतिरिक्त लाईफगार्डच्या ओळखपत्राचा कालावधी वाढवता येईल का, हे मात्र पाहावे लागेल.
शरद उघडे, सहाय्यक आयुक्त, जी-दक्षिण
महापालिकेकडे 11 कायमस्वरूपी लाईफगार्ड आहेत तर दृष्टी लाईफसेव्हिंग या संस्थेतर्फे 93 लाईफगार्ड चौपाटय़ांवर तैनात आहेत. त्याचबरोबर गौरी-गणपतीच्या सणाला पालिपेच्या वॉर्ड ऑफिसमधून विनामूल्य सेवा देणाऱया लाईफगार्ड आणि स्वयंसेवकांना ओळखपत्र जारी केली जातात. मोठया प्रमाणात गर्दी होते अशा 6 चौपाटय़ांवर त्यांची नेमणूक केली जाते.
हेमंत परब, मुंबई अग्निशमन दल प्रमुख
























































