शिवनेरकार स्मृती चषक क्रिकेट – ग्लोबल हॉस्पिटलला ‘बी’ डिव्हिजनचे विजेतेपद 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयडियल स्पोर्टस् अॅपॅडमी, शिवनेर व आयडियल ग्रुप आयोजित शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल ‘बी’ डिव्हिजन टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद ग्लोबल हॉस्पिटल संघाने पटकावले. कपिल गमरेच्या अष्टपैलू खेळामुळे ग्लोबल हॉस्पिटलने कस्तुरबा हॉस्पिटलचा 5 धावांनी पराभव केला. डॉ. परमेश्वर मुंडे व रोहन जाधव यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही कस्तुरबा हॉस्पिटल संघाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  ‘बी’ डिव्हिजन अंतिम लढत शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीची झाली. ग्लोबल हॉस्पिटलचा डाव 20 षटकांत 9 बाद 86 या नीचांकी धावसंख्येवरच आटपला, पण ग्लोबल संघाच्या गोलंदाजांनी या आव्हानाचे रक्षण करताना परिश्रम पणास लावले.

स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार कस्तुरबा हॉस्पिटलचे डॉ. परमेश्वर मुंडे यांना, उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार ग्लोबल हॉस्पिटलचे कपिल गमरे यांना, तर उत्कृष्ट फलंदाजीचा पुरस्कार कस्तुरबा हॉस्पिटलचे रोहन जाधव यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, जेजे हॉस्पिटलचे अधीक्षक  डॉ. संजय सुरासे व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. यावेळी स्पर्धेचे गौरवार्थी क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते यांना आयडियल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच लीलावती हॉस्पिटलचे माजी कर्णधार मनोहर पाटेकर व जे.जे. हॉस्पिटलचे माजी कर्णधार प्रमोद पाताडे यांचादेखील गौरव करण्यात आला.