
सामना प्रतिनिधी, पणजी
देशाचे माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असूनही मंत्रालयात उपस्थित राहत गोव्याचा अर्थसंकल्प मांडणारे मनोहर पर्रीकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली कडवी झुंज आज संपली. त्यांच्या निधनाने साधं राहणीमान… स्वच्छ प्रतिमा आणि शेवटच्या श्वासापर्यंत ऑन डय़ुटी असलेला राजकीय नेता गमावल्याची भावना देशभरात व्यक्त होत आहे. मनोहर पर्रीकर हे 2018पासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते.
प्रकृती अधिक खालावल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांना झोपूनच राहावे लागत होते. मागील पंधरा दिवसांत दोन केळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला. कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला होता. मात्र रविवारी सायंकाळी गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या गोव्याच्या निवासस्थानाजवळ गर्दी वाढू लागली. त्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त दिले आणि त्यांना श्रद्धांजलीही वाहिली. हे वृत्त समजताच केवळ गोवा राज्यच नव्हे तर अवघा देश हळहळला.
फेबुवारी महिन्यात मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून थेट मंत्रालयात उपस्थित राहत त्यांनी गोव्याचा अर्थसंकल्पही मांडला. नुकत्याच झालेल्या भाजपाच्या बूथ कार्यकर्ता संमेलनात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत पर्रीकर हेही उपस्थित होते.
शेवटच्या श्वासापर्यंत ऑन डय़ुटी
14 फेब्रुवारी 2018पासून मनोहर पर्रीकर आजारी होते. प्रथम त्यांना मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल केले होते. तेथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर 3 मार्च 2018 रोजी अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते. तिथून ते 14 जून रोजी परतले होते. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांना अमेरिकेला उपचारांसाठी नेण्यात आले होते. तिथून ते 22 ऑगस्ट रोजी परतले होते. त्यानंतर महिनाभर दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेऊन 15 सप्टेंबर रोजी ते परतले होते. अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर गेल्या 2 जानेवारी रोजी ते कार्यालयात रुजू झाले होते. 27 जानेवारी रोजी तिसऱ्या मांडवी पुलाच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थिती लाकली. त्या वेळी त्यांच्या व्हायरल झालेल्या छायाचित्रावरून विरोधकांसह अनेकांनी त्यांनी आता विश्रांती घ्यावी, असे सल्ले दिले होते. 31 जानेवारी रोजी पुन्हा त्यांना एम्समध्ये नेण्यात आले. तेथूनही ते परतले होते.
अल्पपरिचय
मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर यांचा जन्म म्हापसामध्ये 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. लोलोला हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतील आयआयटीमधून मेटलर्जीमध्ये त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. पर्रीकर हिंदुस्थानातले पहिले आयआयटीयन जे आमदार झाले आणि एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. विद्यार्थीदशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. 1994मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 2001मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचे सरकार केवळ दीड वर्ष टिकले. जून 2002मध्ये पर्रीकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. 2000-2005, 2012-2014 आणि 2017-2019 असे तीन वेळा ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचे नाव सर्वात पहिल्यांदा पर्रीकरांनी सुचवले. 2014मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली. पर्रीकर संरक्षण मंत्री असताना उरी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017मध्ये पर्रीकरांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 13 मार्च 2017मध्ये पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2018मध्ये पर्रीकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे उघड झाले.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी देशभरात दुखवटा पाळला जाईल. या काळात दिल्लीसह इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानीमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.
शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार
मनोहर पर्रीकर यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी गोव्यातील भाजपच्या मुख्य कार्यालयात सकाळी 9.30 ते 10.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तेथून 10.30 वाजता पणजी येथील कला अकादमीत त्यांचे पार्थिव आणण्यात येणार असून सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत नागरिकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर 4.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा मीरामार्गच्या दिशेने निघेल. सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मनोहर पर्रीकर हे एक असामान्य नेतृत्व होते. राष्ट्रभक्त आणि उत्तम प्रशासक असलेले पर्रीकर आधुनिक गोव्याचे शिल्पकार होते. त्यांनी केलेली देशसेवा पिढ्यान्पिढ्या लक्षात ठेवली जाईल.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजाराशी कडवी झुंज दिली. सत्याविषयीची निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक असलेले पर्रीकर यांनी देशाची जी सेवा केली आहे, त्याची आठवण कायम काढली जाईल.
– राष्ट्रपती रामनाथ कोविंद
पर्रीकर यांच्या निधनाने विश्वासू मूल्यांवर निष्ठा असलेले आणि साध्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारे आश्वासक नेतृत्व…जननेता… सच्चा देशभक्त हरपला.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
























































