
‘गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. 18 जानेवारीला जागावाटपावर चर्चा होईल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल 18 जानेवारीला गोव्यात जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा करतील. त्यानंतर कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल,’ अशी माहिती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिली.
गोव्यात काँग्रेसने वेगळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी युती होणार का, या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि गोव्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांची युती आहे. मात्र या क्षणी काँग्रेसने राज्यात इतर कोणत्याही पक्षाशी युती न करता एकटय़ाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शिवसेना-राष्ट्रवादी युतीत काँग्रेस नसेल.’ ‘आम्ही गोव्यात 10 ते 15 जागा लढवू, असेही संजय राऊत म्हणाले.
यावेळी योगी आदित्यनाथ यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, ‘योगीजींच्या गोरखपूरमधून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. त्यांना त्यांच्या मूळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. अपर्णा यादव भाजपमध्ये जाणार असल्याचे मी ऐकले आहे. हे जाणून बरे वाटले.’
































































