अधिकारी व कर्मचारी सहलीवर,जिल्हा क्रीडा कार्यालयात शुकशुकाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी गोव्यास गेल्याने लातूरमधील जिल्हा क्रीडा कार्यालयात शुकशुकाट आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुलातील जिल्हा क्रीडा कार्यालय मागील चार दिवसांपासून ओस पडले आहे. बैठकीच्या निमित्ताने मौज मजा करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी गोवा सहलीवर गेल्याची चर्चा लातूरात केली जात आहे.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयात मागील चार पाच दिवसांपासून एकही अधिकारी, कर्मचारी हजर नाही. बैठकीच्या निमित्ताने सर्वजण बाहेरगावी गेल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात उन्हाळी सुट्टीच्या कारणावरुन गोवा दर्शनासाठी गेल्याचे म्हटले जात आहे. कार्यालय बंद ठेवता येणार नाही. हे लक्षात आल्यानंतर जिल्ह्याचा कार्यभार हाकणाऱ्या या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तालूकाच्या क्रीडा अधिकाऱ्यांना लातूरच्या कार्यालयात येऊन केवळ बसण्याची सूचना केली. त्यानुसार निलंगा, रेणापूर येथील तालूका क्रीडा अधिकारी लातूरच्या कार्यालयात बसलेले दिसून येत होते. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपण बाहेरगावी असून सोमवार नंतर कार्यालयात भेटण्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.