क्रोएशियाच्या जेतेपदासाठी गोवेकरांची प्रार्थना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | पणजी

गोव्यात फुटबॉल प्रेमींची अजिबात कमतरता नाही. गोव्याला फुटबॉल पंढरी म्हणून देखील ओळखले जाते. पोर्तुगाल आणि ब्राझिलचे अनेक चाहते गोव्यात आहेत. यंदा क्रोएशीयाने अंतिम फेरी गाठल्या नंतर गोवेकर क्रोएशीया समर्थक बनले आहेत. कोणताही संबंध नसताना गोव्यात क्रोएशिया समर्थक कसे निर्माण झाले ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यांच्या उत्तरासाठी ४५० वर्षे मागे जावे लागेल.क्रोएशियाने विश्वचषक जिंकावा असे साकडे प्रभूला घालण्यासाठी रविवारी सकाळी गोव्यातील गवंडळी गावातील प्राचीन चर्चमध्ये विशेष प्रार्थना होणार आहे.

गोव्यात पोर्तुगीजांची राजवट असल्याने पोर्तुगाल समर्थक फुटबॉल प्रेमी आहेत त्याच बरोबर बरेच जण ब्राझिलचे देखील चाहते आहेत.क्रोएशीयाने अंतिम फेरीत धडक मारल्या नंतर गोव्यात असलेले क्रोएशीया समर्थक उजेड़ात आले आहेत.

पोर्तुगीजांच्या सोबत आले होते क्रोएशीयन

४५० वर्षे गोव्या वर राज्य केलेल्या पोर्तुगीजांनी आपली जहाजे बनवून घेण्यासाठी क्रोएशीयन लोकांना गोव्यात बोलावून घेतले होते. पोर्तुगीज काळात जुने गोवे हे सत्ताकेंद्र होते. जुने गोवे येथून जेमतेम ५ किमी अंतरावर असलेल्या कुंभारजुवे आणि गवंडळी गावात तेथील भौगोलिक परिस्थिति लक्षात घेऊन जहाज बांधणीची कामे सुरु केली. ही कामे करण्यासाठी आलेल्या क्रोएशीयन लोकांनी गवंडळी गावात वास्तव्य केले होते. जवळपास १२ हजार क्रोएशीयन लोक त्याकाळी गवंडळी येथे वास्तव्याला होते. याच दरम्यान क्रोएशीयन लोकांनी साव ब्राझ चर्च उभारले.त्यपूर्वी तेथे छोटे कपेल होते.क्रोएशीयात डूबरोवनिक येथे जसे चर्च आहे, त्याची हुबेहब प्रतिकृति गवंडळी येथे साकारण्यात आली आहे. त्याकाळात या भागात वास्तव्यास असलेल्या हिंदू लोकांचे धर्मांतरण करण्यात आले होते. त्यामुळे आज देखील अनेक ख्रिश्चन धर्मीयांचे हिंदूंशी रक्ताचे नाते आहे  झ्रावका मॅटिस्टिक या क्रोएशीयाच्या महिला अभ्यासकाने क्रोएशीयाचे गोव्याशी असलेले संबंध जगासमोर आणले. दिल्ली येथे संस्कृत शिकण्यासाठी आलेल्या झ्रावका हिने गवंडळी गावाला भेट देऊन दोन्ही देशांना जोड़णाऱ्या चर्चच्या दुव्याची माहिती जगासमोर आणली होती.

गवंडळीच्या चर्चमध्ये होणार क्रोएशियासाठी प्रार्थना

गवंडळी गावातील क्रोएशीया समर्थक सध्या जाम खुश आहेत. त्यांच्या भागात कधीकाळी वास्तव्यास असलेल्या क्रोएशीयनांचा संघ फीफा फुटबॉलच्या अंतिम फेरीत पोचल्याने सगळे समर्थक उत्साहीत झाले आहेत. उद्या रविवारची सुट्टी असल्याने सगळे जण टीव्हीवर फाइनल बघण्यासाठी आतुर झाले आहेत. उद्या सकाळी सव्वा सात वाजता क्रोएशीया संघ फीफा वर्ल्ड कप जिंकावा म्हणून चर्च मध्ये विशेष प्रार्थना सभा होणार आहे.१९९९ मध्ये क्रोएशीयाच्या शिष्टमंडळाने गोव्यात येऊन गवंडळी चर्चला भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला होता. क्रोएशीयन पर्यटक देखील अनेकदा या चर्चला भेट देत असतात.