Google मराठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनीषा सावंत, [email protected]

गुगलने आपल्या सर्च संमेलनात इतर भाषांसोबत मराठीचाही समावेश केलाय.

मराठी भाषेचा गोडवा काय वर्णावा… ‘माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण’ असे संत ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे. हीच गोड मराठी भाषा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱया लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्पृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. तरीही मराठीची मोहकता आणि माधुर्य काही औरच… गुगलच्याही हे लक्षात आलंय. म्हणूनच तर गुगलने आपल्या सर्च संमेलनात आता इतर प्रादेशिक भाषांसोबत नुकताच मराठीचाही समावेश केला आहे.

मराठी ही इंडो-युरोपीय भाषापुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. प्रत्येक राज्याच्या प्रादेशिक भाषांचा वापर सोशल मिडियामध्ये वाढतोच आहे. तोच नेमका लक्षात घेऊन ‘गुगल सर्च संमेलन’ हा देशव्यापी उपक्रम गुगलने हाती घेतला असून हे संमेलन कालच २२ जूनला पुण्यात भरले आहे. आपल्या भाषांतील साहित्य आणि पुस्तके इंटरनेटच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवू पाहणाऱया प्रकाशक आणि लेखकांना या उपक्रमामध्ये गुगलतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याला गुगलच्या वैशिष्टय़ांचा वापर करून सोशल मीडियामध्ये बळ मिळेल यात शंकाच नाही. यामध्ये मराठीसाठी आवश्यक ‘गुगल’च्या विविध फीचर्ससंदर्भात या कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱया सदस्यांची निवड गुगलच्या टीमनेच केली आहे.

मराठी भाषा  ९ व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. गुगल या संमेलनामध्ये  हिंदीसह मराठी, तामिळ, तेलुगू आणि बंगाली या चार प्रादेशिक भाषांमधील लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स, प्रादेशिक भाषांतील वेब डेव्हलपर्स, मराठीशी संबंधित व्यावसायिकांशी संवाद साधणार आहे. प्रादेशिक भाषांतील साहित्य गुगलच्या वैशिष्टय़ांचा वापर करून कसे पोहोचवता येईल याचा उहापोह या संमेलनात होईल. पुण्यासह दिल्ली, इंदोर, पाटणा, लखनौ, हैदराबाद, विशाखापट्टणम, कोलकाता, कोइमतूर, चेन्नई, बेंगळुरू या शहरांतही संमेलनातील कार्यशाळा होणार आहेत. मराठी भाषेमधील साहित्य इंटरनेटवरील वाचकांपर्यंत कशा पद्धतीने पोहचवायला हवे, यासाठी ‘गुगल’तर्फे सहकार्य करण्यात येणार आहे.