टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून देतेय रोजगार, महिला सक्षमीकरणासाठी तरुणी सरसावली

महिला सक्षमीकरणासाठी एका 16 कर्षीय तरुणीने घेतलेल्या पुढाकाराची सध्या जोरदार चर्चा आहे. गोरखपूर येथील समीरा जालन हिने लॉकडाऊनमध्ये स्कतःचा स्टार्टअप सुरू केला आहे. त्या माध्यमातून ती टाकाऊ कापडापासून फॅन्सी बॅग, पिशक्यांची निर्मिती करतेय. तिच्या पिनथ्रेड या स्टार्टअपमुळे ग्रामीण भागातील गरीब महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

समीराने स्टार्टअप सुरू करण्यामागेदेखील एक खास कारण आहे. लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचारामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. समीरा ज्या परिसरात राहते तिथे तिला या गोष्टीचा प्रत्यय आला. त्यांच्या बाजूला राहणाऱया महिलेला तिचा पती रोज मारहाण करायचा. त्यामुळे महिलांना आत्मनिर्भर कसे करता येईल या दृष्टीने ती विचार करू लागली. त्यातून या स्टार्टअपचा जन्म झाला. सुरुवातीला तिने नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांशी संपर्क साधला. त्यांना शिवणकामाचे धडे दिले. कापड कारखाने, बुटीकमधील फॅब्रिक वेस्ट गोळा करून महिलांना पुरवले. त्यापासून या महिला फॅन्सी बॅग, पिशव्यांची निर्मिती करत आहेत.

अवघ्या दहा हजार रूपयांत तिने स्टार्टअप सुरू केला होता. सोशल मीडियावरून केलेल्या मार्केटिंगमुळे त्यांना चांगल्या ऑर्डर मिळत आहेत. समीरा म्हणाली, महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिल्याने त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. दिवसाचे केवळ दोन तास काम करून त्या चांगली कमाई करतायत. भविष्यात त्या स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करू शकतात. या महिलांना आता आयुष्यभर रोजगाराची चिंता सतावणार नाही. पर्यावरणाच्या रक्षणासोबत महिला सक्षमीकरणासाठी समीराने उचललेल्या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या