
गोरेगावमधील खडकपाडा येथील भंगाराच्या गोदामांना संध्याकाळी सातच्या सुमाराला भीषण आग आगली. गोदामांजवळच्या झोपडय़ा तसेच फर्निचरची दुकाने असल्याने ही आग पसरली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी 12 बंबांच्या साहाय्याने रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणीही जखमी झाले नाही.
दरम्यान, उपमहापौर सुहास वाडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. गोरेगाव पूर्व परिसरातील सामना परिवारासमोरील खडकपाडा परिसरात टारमेंट कंपनीच्या बाजूला संध्याकाळी सातच्या सुमाराला भंगाराच्या गोदामांना भीषण आग लागली. 15 ते 20 हजार चौरस फूट जागेवर गोदामांबरोबरच पत्र्यांच्या झोपडय़ा आणि फर्निचरची दुकाने असल्यामुळे ही आग पसरली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र, आगीची भीषणता वाढल्याने आगीला सुरुवातीला स्तर -2 ची तर काही वेळाने ही आग स्तर -3 ची घोषित करण्यात आली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी 12 फायर इंजिन, 7 जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने या आगीवर रात्री उशिराने नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीचे कारण समजू शकलेले नाही.

























































