गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प – पर्यायी वनीकरणासाठी  पालिका सरसावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून दोन बोगदे तयार केले जाणार असून त्यासाठी वन विभागाला 19.43 हेक्टर पर्यायी जागा देण्यात आली आहे. या जागेवर करण्यात येणाऱया वनीकरणासाठी 1 कोटी 44 लाखांचा खर्च येणार असून हा निधीही पालिका देणार आहे.

मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱया गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. ‘जीएमएलआर’ने पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग व पूर्व उपनगरातील मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडण्यात येतील.

गोरेगाव मुलुंड लिंक रोडची एकूण लांबी 12.2 किमी असून यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली दोन 4.7 किमी लांबीचे दोन भूमिगत बोगदे तयार करण्यात येणार आहेत. शिवाय या लिंक रोडच्या कामात गोरेगाव फिल्म सिटीतील प्रस्तावित कट आणि कव्हर भुयारी मार्गाची लांबीही 1.02 किमी आहे. ‘जीएमएलआर’ प्रकल्पात गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती मार्गाखाली वाहतुकीसाठी 19 मीटर रुंद चार पदरी भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. हे दोन्ही प्रस्तावित बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जात असल्यामुळे त्याऐवजी 19.43 हेक्टर जागा आणि त्या जागेवर वनीकरण करण्याची अट वनखात्याने मुंबई महानगरपालिकेला घातली होती.

पर्यायी जागा, वनीकरण चंद्रपूरमध्ये

पर्यायी वनीकरणासाठी 19.50 हेक्टर जागा चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ मौजे वासनविहिरा आणि मौजे गोंडमोहाडी या चिमूर तालुक्यात खासगी जमीन खरेदी करून वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेवर पर्यायी वनीकरण राबवले जाणार आहे. हे वनीकरण राबवण्यासाठी वन विभागाचे ब्रह्मपुरी उपवनसंरक्षक आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक यांनी 1 कोटी 40 लाख 38 हजार अंदाजित खर्च कळवला आहे. त्यानुसार हा निधी देण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या आगामी बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.