गोशाळेच्या जवळ सापडले 100 हून अधिक गायींचे मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे एका गोशाळेजवळ गायींचे मृतदेह आणि सांगाडे सापडले आहेत. ही संख्या 100 हून अधिक असल्याची माहिती मिळत असून ही गोशाळा भाजपच्या एका महिला नेत्याची असल्याचा दावा दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

ही गोशाळा भोपाळनजीक बैरसिया तहसीलमध्ये आहे. या गोशाळेजवळ असलेल्या एका खड्ड्यात 2 डझन गायींचे मृतदेह सापडले आहेत. तर त्या लगत असलेल्या मैदानात 80 गायींचे मृतदेह आणि सांगाडे सापडले आहेत.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर गोशाळेजवळ काही हिंदू संघटनांनी निषेध मोर्चा काढून गोशाळा संचालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी बैरसिया गावात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. ही पाहणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गोशाळा संचालिका निर्मला शांडिल्य यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्याखेरीज शांडिल्य यांना निलंबित करण्यात आलं असून सध्या जनपद कार्यकारी अधिकाऱ्यांना गोशाळेच्या संचालनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

लवानिया यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक पाहणीनंतर गायींच्या मृतदेहांच्या विल्हेवाटीत निष्काळजीपणा केल्याचं दिसून आलं आहे. गायींच्या मृतदेहाची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने करावी लागते. पण, इथे असं न करता त्यांना उघड्यावर फेकून देण्यात आलं. ते अत्यंत अशोभनीय आहे. ज्या गायींचा नुकताच मृत्यू झाला आहे, त्यांचं शवविच्छेदन सुरू आहे, अशी माहिती लवानिया यांनी दिली आहे.

दुसरीकडे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी या प्रकरणी भाजपवर हल्लाबोल केला आहे. गोशाळेची संचालिका निर्मला शांडिल्य ही भाजपची नेता आहे. बैरसियासह भोपाळ जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शांडिल्य यांच्या गोठ्यात गायींची हाडं आणि चामड्याचा व्यापार सुरू होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात गोहत्येची तक्रार दाखल करावी, गायीच्या हाडांच्या व्यापाराची चौकशी करावी आणि गेल्या काही वर्षांत गोशाळेला जे अनुदान मिळतं, त्याचीही तपासणी करण्यात यावी अशी मागणी सिंह यांनी शासनाकडे केली आहे.