
काही गोष्टी आपल्या मनावर डोंगराएवढं ओझं वाटत असतात. कुणाला तरी सांगायला पाहिजे असं वाटतं. अशा शहराच्या, गावाच्या, माणसांच्या बदलत्या मनाच्या गोष्टी सांगणारं पुस्तक ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’. लेखक अरविंद जगताप यांच्या या पुस्तकाची नववी आवृत्ती प्रकाशित होत आहे. त्यनिमित्ताने लेखकाच्या मनातील गोष्टी सांगणारं हे मनोगत.
गावाकडची प्रत्येक गोष्ट सांगावीशी वाटते. ती आत असतेच कायम, खास करून आता शहरात राहून गावाकडे बघताना खूप गोष्टी नव्याने दिसू लागतात. आपल्या मनात एक अपराधभाव असतो. शहरातलं ऊनसुद्धा जरा मवाळ वाटू लागतं. मित्रांची पण अशीच अवस्था असते. मित्राच्या मुलाने त्याला विचारलं, “पप्पा, गावाकडे पाऊस पडत नाही. अचानक गारा का पडतात?” मित्र म्हणाला, “हलकट असतात त्या.” निसर्गाचाही कधी कधी राग येतो. आजूबाजूचे लोक पावसाबद्दल एवढे रोमँटिक असतात आणि आपली पावसामुळे सारखी चिडचिड होत असते.
शहरातला पाऊस किती वेगळा असतो! गेल्या काही वर्षांत पाऊस आला की, लोक छोटय़ा मोठय़ा मेणकापडाच्या पिशव्या काढू लागतात. त्यात आधी लोक मोबाइल गुंडाळून ठेवतात, मग पैशांचं पाकीट, मग रेनकोट किंवा छत्री. हायवेवर एखादा ओव्हरब्रिज असतो, पूल असतो आडवा गेलेला. त्याच्या खाली कितीतरी बाईकवाले थांबतात. आडोशाला. रेनकोट घालायला. मुंबईत तर रेनकोट घालून होईपर्यंत कधी कधी पाऊस थांबलेला असतो. कधी कधी दिवसभर रेनकोट काढायची लोकांना वेळ येत नाही. पाऊस चालूच असतो. मुंबईतली वर्तमानपत्रं सारखं मुंबईतले तलाव अमुक टक्के भरले तमुक टक्के भरले वगैरे बातम्या टाकत असतात. आपलं लक्ष गोदावरीवर असतं. आपल्या भागातल्या नदीवर, धरणावर पण असतं. आपल्यात घट्ट रुतून बसलेली ही कुठली मुळं आहेत? आपल्याला धडपणे विस्थापितसुद्धा होता आलेलं नाही. गावात आपण शहरातले आहोत. शहरात आपण गावातले आहोत. आपण स्वतला विचारतो की, आपण नेमके कोण आहोत? आपल्याला उत्तर मिळत नाही. खरं तर शहरात राहून आपण गावावर लिहितो हेच किती चुकीचं आहे; पण शहरातल्या विषयावर आपण अजूनही फारसं व्यक्त होऊ शकत नाही. बर्गर आणि पिझ्झा आपल्याला पचण्याचा विषय होऊ शकला नाही, तर सुचण्याचा विषय कसा होऊ शकेल? आपण जाम गंडलोय असं वाटतं कधी कधी,
गावातल्या पक्ष्यांच्या आवाजाच्या आठवणी वगैरे विषय वेगळे. आजकाल गाव बघताना मुंबई-पुण्यात जास्त झाडं आहेत असं वाटू लागतं. शहरातल्या लोकांना उगाचच गावातला मुलगा म्हणजे नदीत पोहणारा आणि विहिरीत डुंबत असणारा वाटत असतो, पण त्याचं बालपण टँकरमागे धावण्यात, हंडा घेऊन पाण्यासाठी आपला नंबर लावण्यात गेलेलं असतं खूपदा. उलट शहरात आल्यावर त्याने अधाशासारखं पाणी पाहिलेलं असतं. माझ्या एका मित्राने सांगितलं होतं, फूल म्हणजे त्याला झेंडूच आठवायचा. त्याच्या गावात दुसरं कुठलं मोठं फुलाचं झाडसुद्धा उरलेलं नव्हतं. गुलाब वगैरे लांबची गोष्ट. पोरं स्पर्धा परीक्षेसाठी शहरात येऊन राहतात. शहरातले मित्र विचारतात, “तुमच्याकडे बैलगाडी असेल ना?” आता बैलच नाही तर बैलगाडी कुठून असणार? मग शहरातल्या मुलांना वाटतं की, बैल नाही म्हणजे हा कसला शेतकरी? गाय नाही याला काय अर्थ आहे? कथा, कादंबरी आणि सिनेमातलं चित्र डोक्यात असतं. ‘सैराट’ सिनेमातल्यासारखी विहीर गावोगाव असते असं वाटू लागतं, पण गावं किती झपाटय़ाने बदललीत हे लक्षात येत नाही. कितीतरी गावांत माणसं दिसत नाहीत. कितीतरी गावांत फक्त म्हातारी माणसं उरलीत. कितीतरी गावांत चार-चार, पाच-पाच महिने कुणी नसतं. सगळे लोक मजुरीसाठी दुसऱया जिह्यात स्थलांतरित झालेले असतात. दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाताना फेसबुकवर फोटो टाकू नका असा सल्ला देतात शहरात. कारण चोराला कळेल, तुम्ही घरी नाही. गावातली माणसं महिनोन्महिने गाव सोडून जातात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर आले पाहिजेत. भले चोरांना कळलं तरी चालेल असं वाटतं. कुणाला तरी कळायला पाहिजे, कुणीतरी दखल घेतली पाहिजे. शेतमजूर कायमचे स्थलांतरित झालेत, शेतकरी शेतमजूर झालेत. माणसं माणसांना भेटतात ते एकमेकांचं दुःख सांगायला, पण प्रत्येकाची गोष्ट सारखीच असते. तुरीने सोयाबीनला काय दुःख सांगायचं? दोघींची गत एकच आहे. कांदा टमाटय़ाला काय सांगणार?
मुंबईसारख्या शहरात पूर, बॉम्बस्फोटासारखी एखादी घटना घडली की लोक एकमेकांच्या मदतीला धावून येतात. जगभर त्याला ‘मुंबई स्पिरिट’ असं म्हणतात. आता त्याच्यावरही विनोद होतात, पण लोक दरवेळी संकटात धावून येतात ही गोष्ट आपण गावात शिकलो, शेतात शिकलो. त्याला इर्जिक म्हणायचे. गावोगाव हे इर्जिक बंद होत गेलं. यंत्र आली म्हणून असं झालं असा आपण समज करून घेतला. पण शेतकरी आत्महत्या असो, हमीभाव असो, पिकांवर येणारे रोग असो. सरकारच काय; आपणसुद्धा एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी कमी पडतोय, आपण एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतोय. आपण मोबाइलमधून डोकं वर करून एकमेकांशी बोललं पाहिजे, मनातलं सांगितलं पाहिजे. पूर्वी गावातल्या माणसाला शहरात जायचं टेन्शन यायचं. आपल्याला शहरात काही कळणार नाही असं त्याला वाटायचं. आता तशी परिस्थिती नाही. पण शहरातल्या माणसाला गाव सहजासहजी कळत नाही. कारण कुठल्या तरी जुन्या समजुती डोक्यात ठेवून त्यांचं स्मरणरंजन चालू असतं. शहरात त्याला लाडाने ‘नॉस्टॅल्जिया’ म्हणतात, पण त्यातलं फार काही आता उरलेलं नाही. गावातल्या खूप मुलांना आता दद्या दद्याचं तोंड बघायला मिळत नाही, गावातल्या मुलांना आता सूरपारंब्या खेळायला मिळत नाहीत. झाडंच नाहीत तशी खूप. खूप गावं अशीही आहेत, जिथं माणसांच्या डोळ्यांत पाणी असतं.
खरं तर या कथा नाहीत, गोष्टी आहेत. खूप काही समजत नाही, खूप काही समजून घ्यायचंय, पण जे काय आहे ते सांगत राहायचंय. सांगितल्याशिवाय राहवत नाही म्हणून तुमच्यासाठी गोष्टी सांगताना आपल्याकडे नेहमी दाद अपेक्षित असते. पण या गोष्टी वेगळ्या आहेत. सगळ्याच गोष्टी दाद अपेक्षित ठेवून सांगितल्या जात नसतात. काही गोष्टी आपल्या मनावर डोंगराएवढं ओझं वाटत असतात. कुणाला तरी सांगायला पाहिजे असं वाटतं.
एकदा शूटिंगच्या निमित्ताने एका गावात ड्रोन हवेत उडवला होता. गावकरी कुतूहल म्हणून जमा झाले होते. त्यातला एक माणूस म्हणाला, “किती दिवस झाले राव वर बघून! आभाळाकडं बघणंच सुटलं होतं.” ऐकून धक्का बसला. माणसं वर बघायचेच विसरून गेलेत. आग ओकणारा सूर्य असतो वर. तेंडुलकर जेवढा कौतुकाने वर आकाशाकडे बघत मैदानात उतरायचा ना, तेवढय़ा कौतुकाने बळीराजा वर बघत शेतात जायला हवं. ऐकायला साधी वाटते ही अपेक्षा, पण खूप अवघड आहे. गावोगावी अशाच गोष्टी आहेत. प्रत्येक शेतकऱयाची गोष्ट वाटते छोटी, पण असते डोंगराएवढी!
गोष्ट छोटी डोंगराएवढी
लेखक : अरविंद जगताप
प्रकाशक : आदित्य प्रकाशन संभाजीनगर
पृष्ठ संख्या : 176, मूल्य : 250 रु.





























































