दारू माफियांवर सरकारचा वरदहस्त, विषारी दारूकांडावरून संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील विषारी दारू प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी “दारू विक्रेत्यांना अटक करता, पण त्यांना संरक्षण देणाऱ्या विधिमंडळातील पोशिंद्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवा,” असे थेट आव्हान देत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या विषयावर अधिक बोलताना राऊत म्हणाले, पुणे आणि पिंपरीमध्ये विषारी दारू पिऊन 15 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजणांची प्रकृती गंभीर असून, ते मृत्यूशी झुंज देत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

राऊत म्हणाले, “पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात आज अवैध धंदे, गुन्हेगारी आणि हातभट्ट्यांचे साम्राज्य फोफावत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी रात्री 10 नंतर शहर बंद करण्याचे आदेश दिले जातात. मात्र कालचे दारूकांड पाहता आता दिवसाही पुणे बंद करण्याची वेळ येईल. कारण हे गुन्हे अंधाराच्या आड नाही, तर भरदिवसा घडत आहेत.” मुख्यमंत्री फडणवीस आता म्हणताहेत की, आम्ही दारूचे नेटवर्क उद्धवस्त करू असे म्हणत आहेत. पुण्यात विषारी हातभट्टीची दारू सहज उपलब्ध होते, याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात अशा अवैध व्यवसायांचे जाळे पसरले आहे, असा आरोप करत राऊत म्हणाले, “सरकार आता राज्यातील दारूचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या घोषणा करत आहे. पण गेली सात वर्षे हे सगळे कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते? असा थेट सवाल यावेळी राऊतांनी विचारला.

“दारू विक्रेत्यांना अटक करणे सोपे आहे. पण त्यांना राजकीय संरक्षण देणारे जे लोक विधिमंडळात बसले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस सरकार दाखवणार का?” असा थेट प्रश्न राऊतांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या कोणालाही सोडू नका या वक्तव्यावर टीका करताना राऊत म्हणाले, “प्रत्येक दुर्घटनेनंतर सरकार एकच वाक्य म्हणते – ‘कोणालाही सोडू नका’. हे वाक्य आता सत्यमेव जयतेखाली कोरून ठेवावे. कारण घटना घडल्यानंतर घोषणा आणि चौकशा सुरू होतात; पण अवैध धंदे करणाऱ्यांवर सरकारचा हात असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.”

राऊत यांनी सरकारवर आणखी निशाणा साधत म्हटले, “आम्ही प्रश्न विचारले की सत्ताधाऱ्यांना मिरच्या झोंबतात. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची अवस्था गंभीर बनली आहे. ज्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे, तिथेही नदीपात्रात हातभट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे सरकारच्या घोषणांपेक्षा वास्तव अधिक भयावह आहे.”