
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यात मोठय़ा उत्साहात दहीकाला उत्सव साजरा झाला, मात्र आयोजकांकडून नियमांचे पालन न झाल्याने या उत्सवाला गालबोट लागले. मुंबईत एका गोविंदाचा मृत्यू तर राज्यभरात 183 गोविंदा जखमी झाले. आयोजकांच्या दुर्लक्षामुळेच या दुर्घटना घडल्या असून दहीहंडी आयोजकांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात गोविंदाना हेल्मेट परिधान केलेले नाही, सेफ्टी बेल्टचाही वापर नाही. शिवाय 14 वर्षांखालील मुलांचाही सहभाग मोठय़ा प्रमाणात दिसून येत होता. यासंदर्भात हायकोर्टाने आदेश देत नियमावली तयार केली आहे मात्र या उत्सवात अनेक आयोजकांकडून या नियमांना केराची टोपली दाखविण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत व पोलिसांमार्फत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका स्वाती पाटील यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.
























































