
सामना प्रतिनिधी । पिशोर
कन्नड तालुक्यातील टाकळी (अंतूर) येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकास ‘ग्रामसभा का संपविली’ असा जाब विचारत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अशोक साहेबराव काळे हे मागील सात वर्षांपासून टाकळी अंतूर (ता.कन्नड) येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी ३० रोजी ग्रामपंचायतीसमोरील मोकळ्या पटांगणात सरपंच वैशाली लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ हजर होती. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेली ग्रामसभा दोन तास शांततेत पार पडली. दरम्यान, ग्रामसेवक अशोक काळे यांनी पटलावरील सर्व विषय चर्चेला घेतले. शेवटी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेला खर्च वाचून दाखवित असताना तुकाराम सुपडू सपकाळ, प्रभू तुकाराम सपकाळ, पंढरीनाथ विठ्ठल सपकाळ, भिकन हरी वाघ, रामकिसन हरी हाडे, कृष्णा पांडुरंग सोनवणे आणि ज्ञानेश्वर सोनाजी निकम (सर्व रा. टाकळी अंतूर) हे सर्व शिवीगाळ करत ग्रामसेवकाकडे आले. वातावरण चिघळत असल्याचे बघून सरपंच वैशाली लोखंडे यांच्या निर्देशानुसार अशोक काळे यांनी ग्रामसभा संपल्याचे जाहीर केले. याचवेळी सर्व आरोपींनी ग्रामसेवक काळे यांना खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केली. यात काळे हे किरकोळ जखमी झाले व त्यांचे कपडे या झटापटीत फाटले. सरपंच वैशाली लोखंडे आणि इतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु पंढरीनाथ सपकाळ आणि भिकन वाघ यांनी ग्रामसभेचे नोंद रजिस्टर आणि सह्या नोंद रजिस्टर फाडून टाकले. दरम्यान, आरोपींनी ग्रामसभेत पेयजल योजना अपूर्ण असताना ताब्यात का घेतली, असा जाब ग्रामसेवक काळे यांना विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. परंतु आम्ही ग्रामसेवकास कोणतीही मारहाण केली नाही, असे सांगितले. ग्रामसेवक अशोक काळे यांना उपचारार्थ पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिशोर पोलीस ठाण्यात सर्व सात आरोपींविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून जीवे मारण्याची धमकी देणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस नाईक एस.बी. बोरडे हे तपास करीत आहेत.






























































