गोरेगावात भव्यदिव्य शिवसृष्टी महोत्सव; बच्चे कंपनीसाठी खेळणी, खवय्यांसाठी चविष्ट खाद्यपदार्थ, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिसेंबर महिना सुरू झाला की चाहूल लागते ते विविध महोत्सवांची. गेल्या काही वर्षांपासून गोरेगाव पश्चिम येथे होणारा शिवसृष्टी महोत्सव हा आबालवृद्धांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. यंदाही 9 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत मोतीलाल नगर नं  1  मधील संकल्पसिद्धी गणेश मैदानात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बच्चे कंपनीसाठी खेळणी, खवय्यांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खाद्यपदार्थांची मेजवानी, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम असे या महोत्सवाचे स्वरूप आहे.

शिवसेना नेते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. 57 आणि 58 च्यावतीने शिवसृष्टी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा संघटक दिलीप शिंदे, शाखाप्रमुख भरत बोऱहाडे, कमलाकांत नांदोसकर आणि शाखा संघटक शोभना सकपाळ महोत्सवाचे आयोजक आहेत. नुकतेच या महोत्सवाचे उद्घाटन माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी गोरेगाव विभागातील शिवसेनेचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आदी पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मॅजिक शो, कोळी नृत्य आणि बरंच काही  

शिवसृष्टी महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे दररोज भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. यात कोळी नृत्य, महाराष्ट्राची लोकधारा, हिंदी बहारदार गीतांचा ऑर्पेस्ट्रा, मॅजिक शो, कराओके सॉंग, होम मिनिस्टर, बॉलीवूड डय़ुप्लिकेट व डान्स, लावणी अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय बचत गटातील महिलांचे स्टॉल लक्ष वेधून घेत आहेत.