कश्मीरमध्ये सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला, १५ नागरिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाई । श्रीनगर

केंद्र सरकारने कश्मीरमधून एकतर्फी शस्त्रसंधीचा आदेश मागे घेऊन काही तासच उलटले असताना दहशतवाद्यांनी पुन्हा सुरक्षा रक्षकांना लक्ष्य केलं. कश्मीरमधील गांदरबल येथील मानसबल भागात रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला. मात्र यात १५ स्थानिक जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू-कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी केंद्र सरकारने शस्त्रसंधीची घोषणा केली होती. पण यादरम्यान दहशतवाद्यांनी अनेकवेळी सुरक्षा रक्षकांवर हल्ले केले होते. त्यानंतर रविवारी केंद्र सरकारने शस्त्रसंधीचा आदेश मागे घेत असल्याचे जाहीर करत ‘ऑपरेशन ऑलआऊट’ मोहीम सुरू केल्याची घोषणा केली होती. यामुळे चवताळलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा रक्षकांवर ग्रेनेड हल्ला करत हिंदुस्थानला डिवचले आहे.

रमजानदरम्यान १४ जूनला श्रीनगरमध्ये रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. तर गुरुवारी दहशतवाद्यांनी ईद साजरी करण्यासाठी घराकडे निघालेल्या औरंगजेब या जवानाचे अपहरण केले होते. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर काही तासानंतर एका जंगलाजवळ गोळ्यांनी शरीराची चाळण केलेला औरंगजेबचा मृतदेह जवानांना सापडला होता. या दोन घटनांनंतर कश्मीर खोऱ्यातील वातावरण कमालीचे तापले असून स्थानिकांकडून जवानांवर दगडफेक करण्यात आली होती.

या दोन घटनांनंतर जम्मू-कश्मीर खोऱ्यातून शस्त्रसंधीचा आदेश मागे घेण्यात आला. तसेच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ‘ऑपरेशन ऑलआऊट’ ही मोहीमही सुरू करण्यात आली आहे.