भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; उद्या सोमवारी मुंबईतही सार्वजनिक सुट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी (7 फेब्रुवारी 2022 रोजी) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार, मुंबई महानगरपालिका प्रशासनानेही सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात शासनाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, रविवारी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे.

या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881( सन 1881चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवारी ( 7 फेब्रुवारी 2022 रोजी) राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या या आदेशानुसार मुंबईतही सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने कळविले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय कार्यालये, महानगरपालिका कार्यालये, शाळा, महाविद्यालये इत्यादी बंद राहतील.