मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेने मैदाने-उद्याने, मोकळय़ा जागा, वाहतूक बेटांच्या दुरुस्ती-सौंदर्यीकरणाची कामे वेगाने हाती घेतली आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबत पालिकेने घोषणा केली होती. यानुसार काम सुरू झाले असून वांद्रे, अंधेरी, मालाडमधील कामे हाती घेण्यात आली आहेत. सहा विभागांतील कामांसाठी पालिका सुमारे सतरा कोटींचा खर्च करणार आहे.
मुंबईचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी पालिकेने या वर्षीच्या अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात सौंदर्यीकणासाठी 200 कोटी, उद्यानांसाठी 126.53 कोटींची तरतूद करण्यात केली आहे. शहरातील प्रेक्षणीय स्थळांमध्ये वाढ करण्यासाठी पदपथ, उड्डाणपुलाखालील जागा, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईभरातील 160 किमी लांबीच्या 149 पदपथांची सौंदर्यीकरणासाठी निवडही करण्यात आली आहे. तर 128 वाहतूक बेटे निवडण्यात आली असून या ठिकाणी झाडे लावून लँडस्केपिंगची कामे, सर्जनशील रेलिंग, शिल्पे, एलईडी दिवे, कडेचे दगड, मध्यवर्ती मिडियन्स, विभाजकांना रंग अशी कामे केली जाणार आहेत. सहा विभागांतील या कामांसाठीचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
लॉकडाऊनमुळे कंत्राटदारांकडून 27 टक्के कमी खर्चात काम
- गेल्या वर्षभरापासून कोरोना काळ आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदारांनी या कामांसाठी थेट 40 टक्क्यांपर्यंत कमी खर्चात काम करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र इतक्या कमी खर्चात दर्जेदार काम होणे शक्य नसल्याचा विश्वास पटल्याने पालिकेने पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली.
- यानुसार 27 टक्क्यांपर्यंत कमी दराने कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. यानुसार आता ही कामे देणार आहेत. यामध्ये एच पश्चिम/पूर्व म्हणजेच वांद्रे पूर्व-पश्चिम, के/पूर्व-पश्चिम अंधेरी पूर्व-पश्चिम आणि पी/उत्तर मालाड पूर्व-पश्चिम विभागातील उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळय़ा जागा, रस्ता दुभाजक, वाहतूक बेटांचे परीरक्षण, दुरुस्ती, सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.


























































