
प्रमुख रेल्वे स्थानकांत लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पैसे उकळले जात असल्याचे उघडकीस आले आहे. प्रवाशांच्या तक्रारीवरून पाच महिन्यांत रेल्वे पोलीस दलातील (जीआरपी) 13 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यात एका वरिष्ठ निरीक्षकाचा समावेश आहे.
मुंबईतील प्रमुख स्थानकांसह ठाणे, पनवेल या रेल्वे स्थानकांत मेल-एक्स्प्रेसमधून मौल्यवान वस्तू नेणाऱ्या प्रवाशांना टार्गेट केले जात आहे. सामान तपासणी केंद्रांवर रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले जाते. तेथून सीसीटीव्ही नसलेल्या रूममध्ये नेले जाते. तेथे प्रवाशांना रोख रक्कम, दागिने वा अन्य वस्तू त्यांच्या असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले जाते आणि कारवाईचा धाक दाखवून पैसे उकळले जात असल्याचे जीआरपीच्या निदर्शनास आले आहे.
सीसीटीव्ही असेल तेथेच बॅग उघडून दाखवा!
प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत केवळ गणवेशधारी वरिष्ठ अधिकारी असतील तसेच सीसीटीव्हींची देखरेख असेल तेथे बॅग तपासण्यास मुभा द्यावी, असे आवाहन जीआरपीने केले आहे.
जीआरपीच्या गाइडलाइन्स रेल्वे स्थानकांत लावा!
प्रवाशांच्या सामान तपासणीसंबंधी रेल्वे पोलिसांच्या गाइडलाइन्स पोलीस ठाण्यांत तसेच रेल्वे स्थानकांवर ठळकपणे लावल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया रेल्वे कार्यकर्ते समीर झवेरी यांनी दिली.