राज्य सरकारच्या विरोधात जीएसटी कर्मचारी रस्त्यावर

राज्य सरकारच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांचा रोष वाढत असल्याचे सध्या चित्र आहे. आता राज्य वस्तू व सेवा कर विभागातील कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी आता रस्त्यावर उतरले आहेत. मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आज काळय़ा फिती लावून ठिय्या आंदोलन पुकारले होते.

राज्याच्या तिजोरीला आर्थिक हातभार लावणाऱ्या विभागातील कर्मचारी अधिकारी सध्या सरकारवर नाराज आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील सर्व जीएसटी कार्यालयांसमोर तसेच माझगाव मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. पुढील चार दिवस आंदोलनाची तीव्रता वाढत जाणार आहे. यानंतरही सरकारने दुर्लक्ष केल्यास विभागातील सर्व संघटना एकत्र येऊन काम बंद  किंवा बेमुदत संप पुकारण्याची तयारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य वस्तू सेवा कर राजपत्रित अधिकारी संघटनेचे  अध्यक्ष विनोद देसाई व सरचिटणीस विजय पुंभार यांनी दिला आहे.

नाराजीची कारणे कोणती

जीएसटीच्या पार्श्वभूमीवर चार वर्षांपूर्वीच सादर झालेल्या अगरवाल समितीच्या पुनर्रचना अहवालाची अंमलबजावणी तातडीने व्हावी, दोन दशकांपासून प्रलंबित राज्यकर अधिकारी वेतनत्रुटी दूर व्हावी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतर महत्वाच्या प्रश्नांवर शासन-प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सरकारचे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राजपत्रित अधिकारी संघटना राज्यातील कार्यालसमोर 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या काळात काळ्या फिती लावून निदर्शनासह ठिय्या आंदोलन पुकारणार आहेत.