
सामना प्रतिनिधी, चंद्रपूर
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटक मार्गदर्शक म्हणजे गाईड्सना आता स्टार रेटिंग दिलं जाणार आहे. त्यांना अभ्यासपूर्ण माहिती असावी आणि पर्यटकांना ती देता यावी, यासाठी ताडोबा व्यवस्थापनानं हा पुढाकार घेतला असून, असा उपक्रम राबवणारा ताडोबा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे.
जगप्रसिद्ध ताडोबाच्या सफारीसाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात. ऑक्टोबर ते जून असे नऊ महिने इथं पर्यटन सुरू असतं. या पर्यटकांना माहितीसाठी दिला जाणारा गाईड हा माहितीनं परिपूर्ण नसल्याचं दिसून आलं. त्यालाच माहिती नसल्यानं तो ताडोबातील निसर्ग, प्राणीविश्वाची माहिती पर्यटकांना नीट देऊ शकत नाही. यासंदर्भात बऱ्याच तक्रारी व्यवस्थापनाकडे आल्या. केवळ वाघ दाखवणं, एवढंच या गाईड्सचं काम झालं आहे. त्यामुळं फुलं-झाडं, पक्षी-प्राणी यांची परिपूर्ण माहिती पर्यटकांना मिळत नाही. त्यामुळं ताडोबा व्यवस्थापनानं आता या गाईड्समध्ये अमुलाग्र बदल करायचा निर्णय घेतलाय. त्यानुसार, स्थानिक व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यमान गाईड्सची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यांच्याकडे कोणत्या बाबीची किती माहिती आहे, हे जाणून घेऊन त्यांना स्टार रेटिंग दिलं जाईल. कमी माहिती असलेल्या गाईडला एक स्टार, तर उत्तम माहिती असलेल्या गाईडला तीन स्टार दिले जाणार आहेत. केवळ माहिती आहे म्हणून हे स्टार दिले जाणार नाही, तर ते किती चांगल्याप्रकारे पर्यटकांना सांगू शकतात, हेही बघितलं जाणार आहे. सोबतच या गाईड्सना प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. यामुळं तीन स्टार असलेल्या गाईड्सना मानधनही वाढवून दिलं जाणार आहे. हे गाईड्स येत्या सिझनपासून म्हणजे एक ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत असतील.
सध्या ताडोबाच्या कोअर आणि बफर झोनमध्ये एकूण 250 गाईड्स आहेत. त्यांना साडेतीनशे रुपये एका फेरीचे मिळतात. पण स्टार रेटिंग झाल्यावर त्यात वाढ होणार आहे. विशेष म्हणजे केवळ वाघासाठी येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. गाईड जेव्हा वनविश्वाची सविस्तर माहिती देतील आणि प्रत्यक्ष ते दाखवतील, तेव्हा वाघ न दिसण्याची निराशा होणार नाही. ताडोबात वाघाशिवाय इतरही वनविश्व संपन्न आहे. त्याचा ख-या अर्थानं प्रसार या नव्या सुधारणेमुळं शक्य होणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, त्यामुळं गाईड्सनाही स्वतःचा विकास करण्याची संधी मिळणार आहे. हा प्रयोग नंतर राज्यातील इतरही व्याघ्र प्रकल्पात राबवला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
गाईडचे प्रस्तावित मानधन
एक स्टार – 400 रुपये
दोन स्टार – 500 रुपये
तीन स्टार – 600 रुपये




























































