
देव ज्याचं संरक्षण करतो, त्याच्यापासून मृत्युही दूर पळतो असं म्हणतात. गुजरातमध्ये एका पाचवीच्या विद्यार्थ्यासोबत हा चमत्कार खरोखर घडला आहे. खोल पाण्यातही गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या साहाय्याने तो सुमारे 24 तास जिवंत राहिला आणि पुन्हा आपल्या घरी पोहोचला आहे.
या मुलाचं नाव लखन असं आहे. लखन हा गणपती विसर्जन पाहण्यासाठी गुजरातच्या धोआली येथील बंदरावर गेला होता. तिथे तो विसर्जन पाहताना समुद्रात खोल पाण्यात गेला. दरम्यान, इथे त्याच्या कुटुंबात एकच गहजब उडाला. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतली गेली. पण, त्याचा कुठेच ठावठिकाणा कळला नाही. दरम्यान, मुलगा बुडाला असावा अशा अंदाजाने घरच्यांनी टाहो फोडला.
मुलगा खोल पाण्यात गेल्यानंतर तो गटांगळ्या खाऊ लागला. पण, विसर्जन झालेली एक मूर्ती त्याच्या हाताला लागली. त्या मूर्तीच्या साहाय्याने तो सुमारे 24 तास पाण्यात तसाच तरंगत राहिला. हळू हळू तरंगत तो 18 नॉटिकल मैल पाण्यात गेला. त्यानंतर तिथून जाणाऱ्या नवदुर्गा या नावेतील मासेमारांकडे पाहून त्याने आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून बोटीतील मच्छिमार त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याला नावेत बसवलं.
त्याला पुन्हा नवसारीच्या बंदरावर आणण्यात आलं. तिथे रुग्णवाहिकेतून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. तिथे सुमारे 36 तासांनी त्याची कुटुंबाशी भेट झाली. त्याच्या जिवंत राहण्याचं कारण समजताच सगळ्यांनाच याचं आश्चर्य वाटत आहे.





























































