बॉयफ्रेंडसोबत सेक्स केल्यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गुजरातमधील नवसारी येथे घडली आहे. तरुणीला रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर बॉयफ्रेंडने तिला डॉक्टरकडे न नेता इंटरनेटवर रक्तस्त्राव रोखण्याचे उपाय शोधू लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सदर तरुण तरुणी हे तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. गेल्या सात महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. सोमवारी ते दोघे एका हॉटेलवर गेले होते. तिथे शारीरिक संबंध ठेवत असताना तरुणीला अति रक्तस्त्राव होऊ लागला. सुरुवातीला बॉयफ्रेंडने कपड्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्तस्त्राव थांबत नव्हता. त्या दरम्यान तरुणी बेशुद्ध पडली. त्याने तत्काळ अॅम्ब्युलन्सला न बोलवता तब्बल तासभर तो रक्तस्त्राव थांबवण्याचे उपाय शोधत राहिला.
त्यानंतर त्याने त्याच्या एका मित्राला हॉटेलवर बोलावले व त्याच्या मदतीने त्याने तरुणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्या तरुणीचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.