मद्यधुंद डॉक्टरने केली महिलेची प्रसूती, आई-बाळाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

गुजरातमधील बोटाद येथे डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एक महिलेला व तिच्या बाळाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी महिलेला प्रसुतीकळा येऊ लागल्याने घरातल्यांनी तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. पण बराच वेळ झाला तरी डॉक्टरच येत नसल्याने महिलेच्या घरातल्यांनी याबद्दल नर्सला विचारले. त्यावर डॉक्टर बिझी असून थोड्या वेळात येतील असे तिने महिलेच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर डॉक्टर आले. पण चालताना व बोलताना ते अडखळत असल्याने महिलेच्या पतीला संशय आला. पण तोपर्यंत डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये गेले होते.

आपल्याला उगाच संशय आल्याचे वाटून महिलेचा पतीही गप्प बसला. पण त्यानंतर काही वेळातच नर्स ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली व तुमची पत्नी व बाळ गेल्याचे तिने महिलेच्या पतीला सांगितले. हे ऐकताच सगळ्यांना धक्काच बसला. कारण महिला सुदृढ होती व तिची प्रसूती नॉर्मल होईल असेही डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेत डॉक्टरने मद्य प्राशन केल्याचा आरोप केला. नंतर डॉक्टरची ब्रेथ एनलाईजर चाचणी करण्यात आली. त्यात डॉक्टरने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरला अटक करण्यात आली.