
सामना ऑनलाईन, नागपूर
मराठी माध्यमाच्या इयत्ता सहावीच्या पुस्तकातील पंधरा पाने गुजराती भाषेत छापल्याची धक्कादायक माहिती आज विरोधी पक्षाने विधान परिषदेत सादर केली. याबद्दल सरकारने माफी मागावी अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी करत विधान परिषदेचे कामकाज ठप्प पाडले.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी हा विषय मांडला. महाराष्ट्रात गुजरातीचे तुष्टीकरण सुरू झाले आहे असा आरोप करत सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात गुजरातीतून धडे छापले आहेत असे त्यांनी सांगितले. यानंतर विरोधी बाकावरच्या आमदारांनी प्रचंड गदारोळ केला. याबद्दल सरकारने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
पुस्तक प्रिंटिंगचे काम रद्द करा-मुंडे
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मराठी व महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. हे एक लाख पुस्तक छपाईचे काम अहमदाबादच्या श्लोक प्रिंट सिटीला दिले आहे. अशी लाचारी चालणार नाही, हे काम रद्द करा अशी मागणी केली. शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनीही याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करावा अशी मागणी केली.
…तर मी विष पिऊन आत्महत्या करेन-तटकरे
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुस्तकाची पाहणी केली आणि तुम्हीच ही पाने पुस्तकात जोडल्याचा आरोप विरोधकांवर केला. त्यावर विरोधक आक्रमक झाले. सुनील तटकरे म्हणाले, जर हे पुस्तक मी छापून आणले आहे असे म्हणत असतील तर मी विष पिऊन आत्महत्या करेन. मराठी भाषेविषयी आयुष्यात असे कधी करणार नाही असे त्यांनी सांगितले.
सभापती रामराजे निंबाळकर यांनी याची तपासणी करून खुलासा करण्याची सूचना केली. त्यानंतरही विरोधकांनी सभापतींच्या समोर येऊन घोषणाबाजी सुरू केल्याने अर्ध्या तासासाठी सभागृह तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी कायम राहिल्याने सभागृह दुसऱयांदा १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.


























































