
सामना प्रतिनिधी । जळगाव
भाजप हा विश्वासघातकी पक्ष असून आगामी निवडणुकांमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार व शिवसेनेचे आमदार निवडून आणण्यासाठी आजपासुन शिवसैनिकांनी कंबर कसुन कामाला लागा. आपण शिवसेनेचे अत्यंत जबाबदार पदाधिकारी आहात, म्हणून एकजुटीने भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव विधानसभा मतदार संघाचे प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, पदाधिकारी यांचा प्रशिक्षण मेळावा रविवारी शहरातील खान्देश सेंट्रल सभागृहात झाला. त्यावेळी पाटील बोलत होते.
व्यासपीठावर जळगाव लोकसभेचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख व माजी आमदार आर. ओ. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जळगाव विधानसभा संपर्कप्रमुख समाधान पाटील, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, महिला आघाडी महानगर संघटीका मंगलाताई बारी, शोभा चौधरी, युवासेना विस्तारक किशोर भोसले, माजी महापौर नितीन लढ्ढा,विष्णू भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मासाहेब मीनाताई ठाकरे यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. बुथ प्रमुख प्रशिक्षण मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिवसेना सहसंपर्कप्रमुख आर. ओ. पाटील म्हणाले की, बुथ प्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मतदारांच्या सतत संपर्कात राहून शिवसेनेचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या तत्त्वानुसार कार्यरत राहा. बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना कर्तव्य व जबाबदारीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वत्र भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक जळकेकर महाराज तसेच जळगाव शहर विधानसभा संपर्क प्रमुख प्रा. समाधान पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
प्रशिक्षण मेळाव्यात यास्मिन शेख इरफान यासह अनेक मुस्लीम भगिनींनी शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्याचे प्रास्ताविक किशोर भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले. मेळाव्याला जळगाव महानगरातील शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक, युवासेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.






























































