‘गुंगी गुडिया’वरून चकमक, काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असे म्हणत हिणवल्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार चकमक उडाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली असून सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका सहन न झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयात धडक देत गोंधळ घातला. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी या वादावर मी वेळ आल्यावर उत्तर देईल, अशी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतील एका घटनेच्या व्हिडिओचा संदर्भ देत काँग्रेसने एक सोशल मिडिया पोस्ट करत सुनेत्रा पवार, यांना ‘गुंगी गुडीया’ म्हणत डिवचले. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ समर्थन या पोस्टचे समर्थन करताना ‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द नसून त्यांच्या मुकेपणाचे ते वर्णन आहे. सुनेत्रा पवारांनी आमच्या टीकेला सकारात्मक घेत इंदिरा गांधींप्रमाणे स्वतःला ‘दुर्गा’ सिद्ध करून दाखवावे,’ असे थेट आव्हान दिले आहे.

त्यांचा मुकेपणा उपमुख्यमंत्री पदाला अशोभनीय -हर्षवर्धन सपकाळ

अजित पवारांच्या अपघातावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, पण त्या काही बोलत नाहीत. अद्याप त्यांना अर्थखाते मिळालेले नाही, त्यावरही त्या गप्प आहेत. त्यांनी जो हा मुकेपणा आणला आहे, तो उपमुख्यमंत्री पदाला अशोभनीय आहे.

चर्चेत राहण्यासाठी कॉँग्रेस खालच्या स्तरावर – फडणवीस

चर्चेत राहण्यासाठी हे सगळं चाललं आहे. बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ अशी यांची विचार करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे आपल्याला पहिल्यांदाच पाहण्यास मिळत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पोस्टबद्दल काँग्रेसने माफी मागावी – सुनील तटकरे

महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही सुसंस्कृत संवादाची आहे, व्यक्तीचा अपमान करण्याची नाही. काँग्रेसने या पोस्टबद्दल महिलांची आणि सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी. महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला.

कॉँग्रेसच्या पत्रकार परीषदेत राष्ट्रवादीचा गोंधळ

काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरु असताना तिथे अचानक सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. जोपर्यंत सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणे, पुणे या ठिकाणीही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

प्रकरण काय?

बीड येथे पत्रकार परिषदेत जिह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना गप्प बसायला लावले. मुंडे पत्रकारांना चूप करत असताना सुनेत्रा पवार एक शब्दही बोलल्या नाहीत. हा व्हिडीओ पोस्ट करून काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ असा शब्दप्रयोग करत टीका केली आहे.