विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या महाद्वार चौकात उभारले जाणार 100 फूटी गोपूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर 

पंढरीच्या विठूरायाचे हजारो कानडी भक्त असून अशाच एका चेन्नईमधील देवस्थानाच्या स्वामींनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोर गोपूर बांधण्याचा संकल्प केला आहे. त्यानूसार येथील महाद्वार चौकात शंभर फूट उंचीचे दाक्षिणात्य पध्दतीचे गोपूर बांधण्यास नगरपालिकेने परवानगी दिली असून आज आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थित स्वामींच्या शिष्यांनी या जागेची पाहणी केली.

कानडा विठ्ठलू कर्नाटकी अशीच पंढरीच्या पांडुरंगाची ओळख आहे. यामुळे दक्षितेतील विविध राज्यातून लाखो भाविक प्रतिवर्षी विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. या पैकी चेन्नई येथील जय हनुमान सेवा ट्रस्टचे कृष्णप्रेमी महाराज यांचा मागील अनेक वर्षापासून पंढरीत भव्य गोपूर बांधण्याचा संकल्प होता. महाराजांचे शिष्य मुरलीधर स्वामी हे काम आता पूर्ण करण्यासाठी प्रयत्नीशील आहेत. त्यानूसार त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेस तसा प्रस्ताव देखील दिला होता. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्‍वर महाराज जळगावर यांच्या माध्यमातून त्यांनी ही सर्व प्रक्रिया राबवली. नगरपालिकेने देखील या प्रस्तावास तत्काळ मंजुरी दिली. त्यानूसार शुक्रवारी सकाळी चेन्नई येथील आर्कीटेक्चर यांनी प्रशांत परिचारक यांच्या समवेत महाद्वार चौक ते महाद्वार घाटा पर्यंतची पाहणी केली.

सदर गोपूर दक्षिणेतील मंदिराच्या बाहेरील प्रवेशाद्वारा प्रमाणे असणार असून याची उंची १०० फूट तर रूंदी ४० फूट निश्‍चित करण्यात आली आहे. महाद्वार चौकात मधोमध हे गोपूर बांधण्यात येणार आहे. अत्यंत अत्याधुनिक पध्दतीने याची उभारणी करण्यात येणार आहे. याचा आरखडा तयार असून केवळ सिमेंटच्या खांबावर गोपूराचे भाग बसविण्यात येणार आहेत. यासाठी लागणार्‍या विटा देखील हालक्या वजनाच्या असणार आहेत. महाद्वार चौकात आषाढी व कार्तिकी श्री विठ्ठलाचा रथ सोहळा तसेच विविध पालख्या जातात. त्यांना या गोपूराचा अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना परिचारक यांनी यावेळी केली. दरम्यान वारीकाळात गर्दीमुळे महाद्वार चौकातून नामदेव पायरीकडे किंवा चंद्रभागा नदीकडे जाताना भाविकांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे या गोपूरात छोटा पूल बांधण्याचा विचार सुरू आहे.

हायड्रोलीक पध्दतीचा हा पूल रथ व पालखी आल्यावर खाली किंवा वर करता येऊ शकतो. महाद्वा चौकात गोपूर बांधल्यानंतर त्याच्या दुसर्‍या टोकाला अर्थात चौफाळा येथे देखील असे गोपूर बांधावे अशी विनंती प्रशांत परिचारक यांनी यावेळी सदर शिष्ठमंडळाला केली आहे.