
एक-दोन रुपयाच्या बचतीने काय होतं? पण ठरवलं तर अशक्य असं काहीच नसतं हे एका रोजंदारी करणाऱ्या मजूराने दाखवून दिले आहे. गुहाटीच्या या मजुराने तब्बल आठ वर्ष एक-दोन रुपयांची नाणी साठवून टू व्हिलर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
आसामच्या रोजंदारी मजूराची ही कहाणी आहे. गुहाटीच्या बोरागांव परिसरात राहणारा हा मजूर म्हणजे उपेन रॉय. त्यांनी 2014 साली 2 व्हिलर घेण्याचे स्वप्न पाहिले होते. पण त्यासाठी लागणारी रक्कम त्यांच्याकडे नव्हती. मात्र टू व्हिलर खरेदी करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांनी टू व्हिलरसाठी पैसे जमवायचे ठरवले. त्यासाठी रॉय यांनी 1 रूपया, 2 रूपया, 5 रुपये आणि 10रुपयांची नाणी एका डब्यात जमा करायला सुरुवात केली. आठ वर्षांनी मंगळवारी त्यांनी तो डबा खोलला आणि पैसे मोजले असता त्यात दीड लाख रुपये जमा झाले होते. त्यांना प्रचंड आनंद झाला आणि रॉय थेट बाईक खरेदी करायला पत्नीसोबत जमवलेले चिल्लर घेऊन ते जवळच्या शोरुममध्ये गेले. त्यानंतर त्याने 90हजार रुपयांना स्कूटी खरेदी करुन आपलं स्वप्न साकार केलं.
ड्रीम बाईकचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी सांगितले, टू व्हिलर खरेदी करणं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी 2014 पासून ते पैसे जमा करत होते. मंगळवारी त्यांनी ते पैसे मोजले त्यावेळी कळले की आता ते टू व्हिलर घेऊ शकतात.

दुचाकी शोरूमचे डीलर मनीष पोद्दार यांनी सांगितले की, ‘शोरूमच्या मालकाने एक ग्राहक नाण्यांचा साठा घेऊन दुचाकी खरेदी करण्यासाठी आल्याचे पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. यानंतर त्यांनी त्यांच्या बँकेशी संपर्क साधला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅंक नाणी स्वीकारेल का मात्र बँकेने त्यास नकार दिला. मात्र, शोरूम मालक निराश न होता त्यांनी काही विक्रेते व दुकानदारांशी संपर्क साधला आणि नाणी बदलून दिली. शोरूममधील चार कर्मचाऱ्यांना नाणी मोजण्यासाठी दोन तास लागले. शेवटी रॉयला त्याची ड्रीम बाईक मिळाली आणि शोरूमने त्याचा गौरव केला.
























































