आश्चर्य… मोबाईलमध्ये सतत बघता यावे यासाठी तरुणाने लावला ‘तिसरा डोळा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल फोन हा आता सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. काही जण तर एक क्षणभरही मोबाईलशिवाय दूर राहू शकत नाहीत. त्यांना सतत मोबाईलमध्ये बघण्याची सवय असते. यामुळे बऱ्याचदा दुर्घटना घडल्याचेही समोर आले आहे. रस्त्यातून चालताना मोबाईलमध्ये बघत चालल्याने पडल्याच्यासुद्धा घटना घडू शकतात. अशा अडचणींचा त्रास होऊ नये याकरिता एका तरुणाने कपाळावर ‘तिसरा डोळा’ लावून घेतला आहे.

दक्षिण कोरियामध्ये राहणाऱ्या या तरुणाचे नाव पेंग मिन वूक (28) असे आहे. व्यवसायाने हा तरुण डिझायनर आहे. यानेच या रोबोटिक तिसऱ्या डोळा बनवला आहे. हा डोळा डोक्यावर लावल्याने कोणीही व्यक्ति मोबाईलच्या स्क्रिनकडे बघत सहज रस्त्यातून चालू शकते. पेंग मिनने या तिसऱ्या डोळ्याचे नाव ‘थर्ड आय’ असे ठेवले आहे.

हा डोळा कसे काम करतो याविषयी पेंग मिन सांगतो की, आज आपले लक्ष सतत आपल्या मोबाईलवर असते. मोबाईल स्क्रिनवरून आपली नजर हटत नाही. यामुळे भविष्यात आपल्याला अजून एका डोळ्याची गरज लागणार आहे, असे मला वाटले आणि मी रोबोटिक डोळा बनवला. या डोळ्यामुळे आपण आपल्यासोबत घडणाऱ्या दुर्घटनांपासून वाचू शकतो. याकरिताच हा तिसरा डोळा तयार करण्यात आला आहे. तिसरा डोळा लावून मोबाईलमध्ये बघत बघत जेव्हा एखादी व्यक्ती रस्त्यातून चालेल तेव्हा पुढे येणाऱ्या धोक्याची सूचना वाजणाऱ्या थर्ड आय बीपद्वारे आधीच मिळू शकेल.

तसेच पेंग सांगतो की, लोकांना मोबाईल वापरण्याचे गांभीर्य लोकांना कळावे आणि मोबाईलमध्ये सतत बघण्याच्या व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा, ही शिकवण लोकांना मिळावी, याकरिता मी या तिसऱ्या डोळ्याचा शोध लावला आहे.