
पंढरपूर शहरातील एका नामांकित जिममधील प्रशिक्षकाने जिममध्ये येणाऱ्या अनेक महिला व मुलींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रशिक्षकाला अटक केली असून, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. श्रीकांत राजू गायकवाड (रा. पंढरपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
एका दाम्पत्याने 18 जानेवारीपासून पंढरपूरमध्ये एक नामांकित जिम जॉईन केली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर जिममध्ये दिलेले होते. सुरुवातीला जिममधील प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड याने डाएटची माहिती देण्यासाठी विवाहितेला मोबाईलवर फोन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने या महिलेला फोन, व्हॉट्सऍप मेसेज करून तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विवाहितेचे पती कामानिमीत्त बाहेर असताना ती एकटी जिममध्ये जात होती.
या संधीचा फायदा घेऊन श्रीकांत गायकवाड हा पीडित महिलेकडे वाईट नजरेने पाहणे, तसेच व्यायामाच्या सूचना देण्याचा बहाणा करून तिच्या अंगाला स्पर्श करणे, असे प्रकार करीत होता. दरम्यान, पीडितेने याची माहिती तिच्या पतीला सांगितल्यानंतर दोघांनी जिममध्ये जाणे बंद केले. त्यानंतर आरोपीने व्हॉट्सऍप चॅटिंग, फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी पीडितेला दिली. त्यामुळे संबंधित पीडितेने पतीसह पंढरपूर शहर पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
निर्भया पथकाचे प्रशांत भागवत, दत्तात्रय आसबे, पोलीस नाईक प्रसाद औटी, नीलेश कांबळे, अरबाज खाटीक, निता डोकडे, कॉन्स्टेबल कुसुम क्षीरसागर, चालक हेडकॉन्स्टेबल अविनाश रोडगे यांनी ही कारवाई केली आहे.
अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचे उघड
तपासात या आरोपीने पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या जिममध्ये तसेच सध्या कार्यरत असलेल्या जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करीत असताना बऱ्याच महिला व मुलींची लैंगिक छळवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. महिला व मुलींना गोड बोलून, त्यांची स्तुती करून व त्यांच्याशी मोबाईलद्वारे चॅटिंग करून त्यांना अलगदपणे प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
























































