Budget 2020 – अर्थसंकल्पाच्या छपाईचा श्रीगणेशा ‘हलवा सेरिमनी’ने का होतो?

530

नवीन वर्ष सुरू झाले असून सर्वांनाच अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. सरकारच्या पोतडीतून आपल्या राज्यासाठी, सर्वसामान्य, नोकरवर्ग, शेतकऱ्यांसाठी काम मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असते. दरवर्षी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडला जातो. या अर्थसंकल्पाच्या कागदपत्र छपाईची सुरुवात सोमवारी झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाच्या सहकाऱ्यांना हलवा देऊन 2020-21 या अर्थसंकल्पीय वर्षाच्या कागदपत्रांच्या छपाईच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

निर्मला सीतारामन 2019 मध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता. आता त्या दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. सोमवारी याची प्रक्रिया सुरु झाली. केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. तोपर्यंत दिल्लीतील अर्थ मंत्रालयाच्या ‘नॉर्थ ब्लॉक’ कार्यालयामध्ये कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मात्र दरवर्षी अशाचप्रकारे हलवा प्रक्रियेने अर्थसंकल्प छापण्यास सुरुवात केली जाते.

‘हलवा सेरिमनी’ म्हणजे काय?
‘हलवा सेरिमनी’नंतर पुढील 10 ते 15 दिवस अर्थमंत्रालयातील अर्थसंकल्प छपाईशी संबंधित कर्मचारी मंत्रालयातच कैद असतात. संपूर्ण अर्थसंकल्पाची छपाई झाल्याशिवाय त्यांना मंत्रालयातून बाहेर पडता येत नाही. विशेष म्हणजे त्यांना कुटुंबाशीही संपर्क साधता येत नाही. अर्थमंत्री याच सर्व कर्मचाऱ्यांना हलव्याचे वाटप करुन तोंड गोड करुन अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात करण्यासाठी मंजूरी देतात.

budget

…म्हणून कर्मचारी अर्थमंत्रालयात कैद असतात
अर्थसंकल्प सादर होण्याआधी अर्थमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्येच रहावे लागते. एकदा हे कर्मचारी इथे कैद झाल्यानंतर अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाल्यानंतरच या कर्मचाऱ्यांना ‘नॉर्थ ब्लॉक’मधून बाहेर पडण्याची परवानगी मिळते. अर्थसंकल्पाची छपाई ही गोपनीय गोष्ट असल्याने या कर्मचाऱ्यांना काही दिवसांसाठी संपूर्ण जगाशी संपर्क तोडावा लागतो.

आपली प्रतिक्रिया द्या