माझी बीसीसीआयमध्ये मोठी ओळख नव्हती, त्यामुळे कर्णधार होऊ शकलो नाही – हरभजन सिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळातील( बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांना मी ओळखत नव्हतो आणि माझी कुणाशीही खास जवळीक नव्हती. माझ्या नावाची शिफारसही कुणी संघनेतृत्वासाठी केली नाही. त्यामुळेच कदाचित मी संघाचा कधी कर्णधार झालो नाही, असा खळबळजनक आरोप टीम इंडियाचा माजी ऑफस्पिनर हरभजनसिंगने केला आहे.

हरभजनने डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. गेल्या काही महिन्यांपासून हिंदुस्थानी संघाचे कर्णधारपद चर्चेत आहे. याच संदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर हरभजन सिंगने थेट हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयवर गंभीर आरोप केला आहे.

हरभजनला हिंदुस्थानी संघाचे कर्णधारपद मिळाले नसले तरी आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. 2011 साली मुंबई संघाने हरभजनच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरुचा पराभव करून चॅम्पियन्स लीग टी-20 चे विजेतेपद मिळवले होते. त्याने आयपीएलच्या 20 सामन्यात नेतृत्व केले त्यापैकी 10 मध्ये विजय मिळवला. टीम इंडियाकडून खेळताना त्याने 103 कसोटीत 417 विकेट, 236 वनडेत 269 तर 28 टी-20 मध्ये 25 विकेट घेतल्या आहेत.

तुम्ही बोर्डातील पॉवरफुल सदस्याचे फेव्हरिट नसाल तर तुम्हाला कर्णधार बनण्याचा सन्मान मिळत नाही. पण मला वाटते की आता या गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मी टीम इंडियाचे नेतृत्व करण्यात सक्षम होतो. मी अनेक कर्णधारांना मार्गदर्शन करत होतो. मी हिंदुस्थानचा कर्णधार झालो नाही, ही फार मोठी गोष्ट नाही. देशाचा कर्णधार नाही झालो याबद्दल मला वाईटही वाटत नाही. एक खेळाडू म्हणून देशाची सेवा करण्यात नेहमीच अधिक आनंद मिळतो.
– हरभजन सिंग, माजी क्रिकेटपटू