हार्बर विस्कळीत : सकाळी रुळाला तडे गेले तर रात्री ओव्हरहेड वायरवर छत्री पडली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेच्या लोकल सेवा बिघाडसत्राची मालिका सुरूच असून हार्बर मार्गाच्या चेंबूर ते टिळकनगर स्थानकांदरम्यान अप मार्गावर गुरुवारी सकाळी 7.58 वाजता रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तर रात्री आठच्या सुमारास चुनाभट्टी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर कोणीतरी छत्री टाकल्याने हार्बरच्या प्रवाशांना दुहेरी फटका बसला.

सकाळी 7.58 वाजण्याच्या सुमारास हार्बर मार्गावरील चेंबूर ते टिळकनगर स्थानकांदरम्यान अप मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. बुधवारीच हार्बर मार्गावर सिमेन्स लोकलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हार्बरच्या लोकल तासभर लेट झालेल्या होत्या. वाशी स्थानकापासून पुढे वाहतूक बंद केल्याने सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. सकाळी 8.24 वाजता रेल्वे रुळाची दुरुस्ती पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यानंतर अप मार्गावरील सीएसटीच्या दिशेने वाहतूक सुरू करण्यात आली. तोपर्यंत लोकल गाडय़ांच्या रांगा लागल्याने कामावर जाणाऱया प्रवाशांना लेट मार्क लागला. तर रात्री आठच्या सुमारास चुनाभट्टी स्थानकानजीक कोणीतरी ओव्हरहेड वायरवर छत्री टाकल्याने हार्बर सेवा अर्धा तास विस्कळीत झाली.