हार्बरच्या प्रवाशांना ‘ओव्हरहेडेक’! स्टंटबाज रुळावर कोसळला; दुरुस्ती मशीन मार्गात अडकली, बेलापूर, सीवूड, नेरुळ रेल्वे स्थानकांत प्रवाशांची लटपंटी

रिल बनवण्याच्या नादात अल्पवयीन मुलाचा हात ओव्हरहेड वायरला लागला आणि तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. नेरुळ येथील राजीव गांधी पुलाच्या जवळ घडलेली ही घटना घडून दोन तास उलटत नाही तोच सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुरूस्ती मशिन रुळावर पडली. लोहमार्गाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी घेतलेल्या मेगाब्लॉकचा कालावधी संपत असतानाच हा प्रकार घडल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल गाडय़ांची वाहतूक रात्री उशिरापर्यंत विस्कळीत झाली. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमध्ये आज दिवसभर हार्बर रेल्वे मार्गावर गोंधळ आख्यान सुरू राहिल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

हार्बर रेल्वे मार्गावर वाशी ते पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे प्रशासनाने आज मेगाब्लॉक घेतला. त्यामुळे या मार्गावर लोकल गाडय़ांची वाहतूक सकाळी 11 ते सायंकाळी 4 या कालावधीत बंद ठेवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात आल्या. सायंकाळी मेगाब्लॉकचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दुरुस्तीचे काम बंद करण्यात आले. त्याचदरम्यान सायंकाळी साडेचार वाजता नेरुळ आणि सीवूड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दुरुस्ती मशीन रेल्वे रुळावर कोसळली आणि सुरू होणारी रेल्वे वाहतूक पुन्हा लटकली. या घटनेनंतर रेल्वेच्या दुरुस्ती पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि ही महाकाय मशीन लोहमार्गावरून हटवण्याचे काम सुरू केले. मात्र या प्रकारामुळे रात्री उशिरापर्यंत  बेलापूर आणि वाशी रेल्वे स्थानकांदरम्यान लोकल गाडय़ांची वाहतूक ठप्प झाली होती.

प्रवाशांची मोठी गर्दी

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या तांत्रिक बिघाडाच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते वाशी  आणि बेलापूर ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवल्या. त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला असला तरी बेलापूरपासून ते वाशीपर्यंतच्या रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली. ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांनाही या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला.

रिल बनवणे अंगलट आले

बेलापूर येथे राहणारा आरव श्रीवास्तव (16) हा मुलगा आज दुपारी रिल बनवण्यासाठी नेरुळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ आला होता. स्टंट करण्यासाठी तो रेल्वे यार्डत पार्क केलेल्या कचरा जमा करणाऱ्या व्हॅनवर चढला. स्टंट करीत असताना त्याचा हात ओव्हर हेड वायरला लागला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो खाली कोसळून गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने आपोलो रुग्णालयात दाखल केले.