कायदामंत्री रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली! हरिश साळवे यांचे स्पष्ट मत

न्यायमुर्तींची निवड करणाऱया कॉलेजियम पद्धतीवर टीका करताना न्यायव्यवस्थेवर टिप्पणी करून केंद्रीय कायदामंत्री किरण रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली असे स्पष्ट मत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. हरिश साळवे यांनी मांडले आहे.

गेल्या आठवडय़ात सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांची केंद्र सरकारने घाईघाईत केलेल्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. त्यावरून दोन दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना कायदामंत्री रिजिजू यांनी न्यायमुर्तींची नियुक्ती करणाऱया कॉलेजियम पद्धतीवर टीका केली होती. ‘सरकारकडे फाईल प्रलंबित आहे असे म्हणू नका. सरकारकडे फाईल पाठवूच नका. तुम्ही स्वतःच स्वतःची निवड करा’, अशी टिप्पणी रिजिजू यांनी केली होती. त्यामुळे न्यायमुर्ती एस. के. कौल यांनी नाराजी व्यक्त केली. आज या संपूर्ण घटनाक्रमावर ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी स्पष्ट भुमिका मांडली आहे.

साळवेंची परखड भूमिका

एखादा असंविधानिक कायदा पाहून सर्वोच्च न्यायालयाने हाताची घडी घालून त्याकडे फक्त पाहत रहावे. कायद्यातील सुधारणेसाठी सरकारच्या दयेवर आणि अधीन रहावे असे जर कायदामंत्र्यांना वाटत असेल, तर माफ करा, ती त्यांची चुकीची धारणा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाचा कायदा काढून टाकला पाहिजे असे माझे मत आहे. इंग्रजांच्या काळात हा कायदा बनवला होता. त्याचा आता काहीही गरज नाही.