सैन्य भरतीसाठी धावणाऱ्या 5 तरुणांना कारने चिरडले, 2 ठार, तीन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरियाणातील फरिदाबाद येथील कुंडली-मानेसर-पलवल रस्त्यावर सैन्य भरतीसाठी धावणाऱ्या पाच तरुणांना रविवारी भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. उत्तरप्रदेश येथे नोंदणी असणाऱ्या क्रमांकाच्या कारने या युवकांना मागून धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानुसार पेलक गावातील रहिवासी तोताराम यांचा भाऊ लोकेश आणि पेलक गावातील त्याचे इतर सहकारी, विवेक, सौरभ, सनी आणि हरीश हे सैन्यात भरतीच्या तयारीसाठी केएमपी मार्गावर धावत होते. यशपाल यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पलवल येथून भरधाव वेगाने येणाऱ्या UP-31, AT-1095 या क्रमांकाच्या अल्टो कारने या पाच तरुणांना धडक दिली, यात पाचही तरुण गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर आरोपी चालक कारसह पळून गेला. यावेळी या पाच जखमी तरुणांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी लोकेश आणि त्याचा साथीदार विवेक यांना मृत घोषित केले. तर जखमी सौरभ, सनी आणि हरीश यांना प्राथमिक उपचारानंतर दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तक्रारीनुसार आता पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.