
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेब व नथुरामसारखा थंड डोक्याने कारस्थाने करणारा आहे. फडणवीस हे केवळ दरिंदे (क्रूर) नाहीत तर आता ते लोकशाही, माणुसकी, संस्कृती व भारताच्या संविधानाला फाशी देत आहेत. देवेंद्र फडणवीस हे लोकशाही आणि महाराष्ट्र धर्माला फासावर लटकणारे जल्लाद आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना भाजपच्या गुंडांनी अपहरण करून मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याविरोधात काँग्रेस पक्षाने दिवसभर ठिय्या दिला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी तातडीने श्रीरामपूरला भेट दिली आणि स्थानिक आमदार हेमंत ओगले यांच्यासह जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. यावेळी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ यांनी, पोलीस हे कुणाच्या दबावाखाली काम करीत आहेत? दडपशाही करणाऱ्या स्थानिक गुंडांना पोलीस कुणाच्या आशिर्वादाने पाठीशी घालत आहेत, असा जाब विचारत पोलिसांची आणि स्थानिक गुंडांना पाठीशी घालणाऱ्यांची दडपशाही खपवून घेणार नाही असा सज्जड दम दिला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिवसभर ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शेवटी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान रक्षणाची शपथ घेतली.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे पंचायत समितीचे माजी सभापती वंदनाताई मुरकुटे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

























































