
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री ऍण्ड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरू आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरू असून भाजप महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपय्या’चे वगनाटय़ जोरात सुरू आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत भाजपवर कडाडून टीका करताना सपकाळ म्हणाले की, सत्तेत विरोधकच नको अशी प्रवृत्ती भाजप व महायुतीची बनली असून त्यातून बिनविरोधसाठी सत्ताधारी कोणत्याही स्तराला जात आहेत. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला अर्ज भरू न देणे, धमक्या देणे, दबाव तंत्राचा वापर करणे त्याचबरोबर पोलीस, प्रशासन यांच्या मदतीने हा खेळ सुरू आहे. निवडणूक आयोग मात्र याचा मूक साक्षीदार बनला आहे. लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ‘नोटा’चा पर्यायही आहे. बिनविरोधच्या ठिकाणी मतदारांना ‘नोटा’ वापरण्याची संधी द्यावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
…तर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे
महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेतील तीन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले असून तेच एकमेकांवर टीका करत आहेत. ‘मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर’ असा हा सर्व प्रकार सुरू आहे. ते जर एवढेच गंभीर आहेत, तर अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे नाहीतर भाजपने अजित पवार यांना बाहेरचा रस्ता दाखवावा असेही सपकाळ म्हणाले.
राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली
संवैधानिक पदावरील व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाच्या आपल्या पहिल्या कारकीर्दीत पक्षांतर बंदी कायदा मोडीत काढून लोकशाही व संविधानाच्या छातीत सुरा खुपसण्याचे काम केले. आता विरोधकांना अर्ज भरू देण्यात अडथळा आणणे, विरोधकांना धमक्या देणे, पदाचा गैरवापर करणे अशा प्रकारचे कृत्य नार्वेकरांनी केल्याचा आरोप करत राष्ट्रपतींनी त्यांना पदावरून बडतर्फ करण्याची मागणी सपकाळ यांनी केली.


























































