
सामना ऑनलाईन । जींद
तिहेरी तलाक विरोधातील कायदा, कलम 370 हटवणे असे धडाकेबाज निर्णय घेतल्याने केंद्रातील सरकारला मिळणारा पाठिंबा वाढतो आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. हरियाणामध्ये आयोजित एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना काँग्रेसवर कडाडून टीका केली. काँग्रेसला 70 वर्षात जमलं नाही ते मोदी सरकारने 75 दिवसात करून दाखवलं, असं अमित शहा म्हणाले.
पाच वर्षांपूर्वी चौधरी बीरेंद्र सिंह यांना भाजपचे सदस्य बनवण्यासाठी मी आलो होतो. त्यानंतर आता चौथ्यांदा येतो आहे, असं म्हणतानाच त्यांनी हरियाणात भाजप बहुमत मिळवत सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेत भाजपला 300 पार नेण्यात हरयाणाच्या जनतेची मेहनत आहे. गेल्यावेळी हरियाणात आलो तेव्हा तुम्ही बहुमत असलेली सरकार दिले आता देखील तुम्ही भाजपला मतदान करत बहुमताचे सरकार निवडून द्याल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कलम 370 हा इतिहासाचा भाग झाला आहे. युद्धकाळात लष्काराच्या तिनही दलांना एकत्र घेऊन युद्धाची रणनीती आधी शक्य नव्हते पण आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची घोषणा मोदी सरकारने केल्याने ते शक्य होणार आहे. त्याचसोबत शेतकरी, व्यापाऱ्यांना पेन्शन आणि गरीब आधार देणाऱ्या योजना मोदी सरकारने लागू केल्याचे अमित शहा म्हणाले. कलम 370 हटवणे यापेक्षा मोठी श्रद्धांजली कोणती असेल, असेही ते म्हणाले.
























































